बटाटा नुकसानीची माजी गृहमंत्र्यांकडून पाहणी

सातगाव पठार भागात नुकसानीबाबत शेतकऱ्यांबरोबर केली चर्चा
पेठ :
सातगाव पठार (ता. आंबेगाव) येथे गेल्या शनिवारी (दि. 22) पहाटे पाच ते सातच्या दरम्यान ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे बटाट्याच्या आरणीत पाणी घुसले. यामुळे बटाटा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतावर जाऊन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येथे पाहणी करून शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत चर्चा केली. याप्रसंगी विष्णूकाका हिंगे, प्रदीप वळसे पाटील, नीलेश थोरात उपस्थित होते.

सातगाव पठार भागातील पेठ, कुरवंडी कारेगाव, थुगाव, भावडी कोल्हारवाडी, पारगाव येथे पावसाचा फटका बसला आहे. या पावसात अनेक शेतकऱ्यांचे बटाटे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. बटाटा लागवडीपासूनच सततचा पाऊस आहे. ऐन दिवाळीमध्ये पावसाचे हे संकट आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले झाले. हा परिसर बटाटा पिकाचे आगर आहे.

सध्या काढणीनंतर शेतकऱ्यांनी बटाटे आरणीत साठवून ठेवले होते. या नुकसानीबाबत शेतकऱ्याला मदत करण्याचे काम राज्य शासनाने तातडीने करावे अशी मागणी सरपंच संतोष धुमाळ, मंगेश पवळे, ग्रामपंचायत सदस्य संजय पवळे, सचिन पानसरे विकास बारवे, रमेश सावंत, राजू तेली, मनोहर भोजने, प्रमोद धुमाळ, जितेंद्र तोतरे आदी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मागणी केली आहे.

यावेळी लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न शासन दरबारी प्राधान्यक्रमाने करू, असे आश्‍वासन दिलीप वळसे पाटील यांनी दिले.