पुणे जिल्हा | इन्स्टाग्राममुळे पिस्तूल विक्रीचे रॅकेट उघड

बारामती, (प्रतिनिधी)- इन्स्टाग्रामच्या स्टेटसवरुन बारकाईने तपास झाल्यानंतर पिस्तुलाची देवाणघेवाण करणारी एक साखळीच बारामतीत असल्याचे उघड झाले. कोयत्याचे चित्र ठेवणा-या युवकाविरुध्द बारामती तालुका पोलिसांच्या तपासानंतर त्याच्याकडे पिस्तूल असल्याचेही पुढे आले. त्यातून साखळीच पुढे आली आहे. पिस्तूल विक्रीच्या रॅकेटमधील तीन जणांच्या मुसक्या आवळल्या तर एकजण फरार आहे.

आकाश शेंडे (रा. सावळ) , रोहित वणवे (रा. लाकडी, ता. इंदापूर), सागर भिंगारदिवे (रा. तांदुळवाडी, ता. बारामती) , असे अटकेतील तिघांची नावे आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने पोलीस हे सातत्याने समाजमाध्यमांवर नजर ठेवून आहेत. सावळ येथील शेंडे याने इन्स्टाग्रामला धारदार कोयत्याचे स्टेटस ठेवल्याचे फौजदार राजेश माळी यांना दिसले.

शेंडे याला ताब्यात घेऊन त्याच्या मोबाइलची तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे पिस्तूल असलेले फोटो निदर्शनास आले. चौकशीनंतर त्याचा साथीदार रोहित वणवे याच्याकडे पिस्तूल दिल्याचे निष्पन्न झाले. वणवे यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे पिस्तूल व एक मोकळी पुंगळी सापडली.

तपासात वणवे याने हे पिस्तूल भिंगारदिवे याच्याकडून दोन महिन्यांपूर्वी विकत घेतल्याचे निष्पन्न झाले. पथकाने भिंगारदिवेकडे चौकशी केल्यानंतर ते ओंकार महाडीक (रा. बारामती) याच्याकडून घेतल्याचे त्याने सांगितले. महाडिक याचा शोध सुरू आहे. त्याच्याकडून धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

साखळी जोडत तपास सुरू
केवळ इन्स्टाग्रामच्या स्टेटसवरुन पोलिसांनी ही साखळी जोडली आहे. यातीत तीन आरोपींना गजाआड केल्यानंतर आता महाडिक याचा शोध पोलीस घेत आहेत. पिस्तूल विक्रीच्या रॅकेटमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत, याचा तपास वेगाने सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी दिली.