सकाळी 11 वाजेपर्यंत करा गणरायाची प्रतिष्ठापना

पुणे – गणेशोत्सव अवघ्या 24 तासांवर आला आहे. या लाडक्‍या बाप्पांचे मुहूर्तावर आणि यथासांग पद्धतीने स्वागत करण्याची जय्यत तयारी घरोघरी जवळपास झाली आहे. यंदाचे विशेष म्हणजे अंगारक योगावर (मंगळवारी) गणेशाचे आगमन होत आहे. त्यामुळे याला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे.

सूर्योदयापासून सकाळी 11 वाजेपर्यंतचा काळ मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी अत्यंत शुभ आहे. यातही सकाळी साडेसहा ते नऊ हा कालावधी सर्वोत्तम आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शक्‍यतो दुपारी 01. 43 मिनिटांपर्यंत गणेश स्थापना करावी. यानंतर चतुर्थी समाप्ती असल्याचे पंडित वसंतराव गाडगीळ यांनी सांगितले.

मंगळवारी शुभ मुहूर्तावर घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य भागात श्री गणेशाची स्थापना करावी. घरातील परंपरेनुसार दीड, तीन, पाच, सात, दहा जितके दिवस गणपती असेल तितके दिवस दररोज सकाळ-सायंकाळ बाप्पांची मनोभावे पूजा आणि आरती करून नैवेद्य दाखवावा. अनेक ठिकाणी अर्ध्या दिवसाचा गणपती असतो. या गणपतींचे विसर्जन मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेनंतर करावे.