अग्रलेख : अनंत अमुची ध्येयासक्‍ती…

वर्णद्वेषाची फोफावत चाललेली विषवल्ली ऑस्ट्रेलियातही दिसून आली. त्यांना जो काही मानसिक त्रास द्यायचा होता तो त्यांनी भारतीय संघाला जमेल तितका दिला. पण परिणाम उलटाच झाला. भारतीय संघाचे मनोधौर्य खालावण्याऐवजी उंचावले आणि जो कसोटी सामना आपण हरणारच अशी खात्री होती, तो आपण केवळ अनिर्णितच राखला नाही तर, नैतिक विजयही मिळवला.

हा सामना एकवेळ आपण जिंकू असे वाटत होते, पण मोक्‍याच्या क्षणी आपले फलंदाज विशेषतः चेतेश्‍वर पुजारा व ऋषभ पंत बाद झाले व नंतर रवीचंद्रन अश्‍विन आणि हनुमा विहारी यांनी सामना वाचवण्यासाठी बचावात्मक फलंदाजी केली आणि आपल्या ध्येयाकडे शांतपणे वाटचाल करताना अनंत अमुची ध्येयासक्‍ती… हीच उक्‍ती सिद्ध केली. हिटमॅन रोहित शर्मा, शुभमन गिल, कर्णधार अजिंक्‍य रहाणे असे एकेक मोहरे गारद होत असताना एका बाजूने चेतेश्‍वर पुजारा व ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियावर वर्चस्व मिळवण्यात यश मिळवले. पुजारा स्थिरावल्यावर बाद झाला मात्र, तरी देखील भारतीय फलंदाजांच्या चेहऱ्यावर कोणतेही दडपण दिसले नाही, इथेच ऑस्ट्रेलियाचा नैतिक पराभव झाला.

पंतने यापूर्वी जी काही बेजबाबदार खेळी दाखवली ती सगळीच्या सगळी त्याने या सामन्यात भरून काढली. जे त्याच्यावर टीका करत होते ते देखील आता त्याच्या कौतुकाचे इमले चढवत आहेत. सर्वात महत्त्व जाणवले ते हनुमा विहारीचे. या माणसाने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना इतके निराश केले की आपण याला गोलंदाजी का करत आहोत, असा प्रश्‍न त्यांना पडला असावा. सामन्याच्या सकाळच्या सत्रात पुजाराने तर दुसऱ्या व तिसऱ्या निर्णायक सत्रात विहारीने त्यांच्या गोलंदाजांना संयम काय असतो याचे दर्शन घडवले. एकवेळ विहारीची आकडेवारी 100 चेंडूत 6 धावा अशी होती, म्हणजेच त्याने मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेजलवूड आणि नाथन लॉयन यांना खरोखर रडकुंडीला आणले.

पंत किमान धावा काढण्याचा प्रयत्न करताना आक्रमणही करत होता. विहारीने बॅट मॅन केली होती. कितीही आणि कसाही चेंडू टाकला तरी तो खेळूनच काढायचा या एकाच निश्‍चयाने तो खेळपट्टीवर उभा होता. खुद्द समालोचकही त्याच्या संथ फलंदाजीवर ताशेरे मारण्याऐवजी प्रचंड कौतुक करत होते. पुजाराने दोनशेपेक्षा जास्त तर विहारीने दीडशे पेक्षा जास्त चेंडू खेळले आणि यजमान संघाला नैराश्‍याच्या गर्तेत ढकलले. त्यांची मानसिकता इतकी खालावली होती की त्यांचा नाथन लॉयन याने अनेकदा अपील करताना तो पंचांकडे दाद मागतोय की भिक्षा, हेच कळत नव्हते. इथेच त्यांनी विजयाची आस सोडली व भारताच्या तंत्रशुद्ध फलंदाजीला आणि मानसिक खंबीरतेला सलाम केला. कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात शंभरपेक्षा जास्त षटके खेळण्याचाही भारतीय संघाने या सामन्यात विक्रम साकार केला. या सामन्यात भारतीय संघावर शाब्दिक हल्ले झाले. ऑस्ट्रेलियाच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी टीका केली. त्यांच्या माध्यमांनीही विनाकारण कोणत्याही गोष्टींना लक्ष्य करत खेळाडूंवर ताशेरे ओढले.

भर मैदानात त्यांच्या काही आचरट प्रेक्षकांनी भारताच्या जसप्रीत बुमराह व महंमद सिराज यांना उद्देशून वर्णद्वेषी टीका केली. ही टीका इतकी पराकोटीची होती की त्यासाठी थेट ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला बीसीसीआयची तसेच संपूर्ण भारतीय संघाची माफी मागावी लागली. एकतर ऑस्ट्रेलिया हा देश दिसायला पर्यटक म्हणून सुंदर असला तरीही त्यांची मानसिकता विद्रुपच आहे हे वेगळे सांगायला नको. इंग्लंडच्या अधिपत्याखालील देशांमध्ये जे गुन्हेगार होते त्यांना एका निर्जन बेटावर इंग्रजांनी काळ्यापाण्याची शिक्षा केली होती, त्यांची वसाहत म्हणून हा देश ओळखला जात होता. क्रिकेटची पाळेमुळे इंग्रजांमुळेच तिथे रोवली गेली असली, तसेच हा खेळ सभ्य गृहस्थांचा आहे असे जरी म्हटले जात असले तरी तशी कोणतीही लक्षणे त्यांच्या खेळाडूंमध्ये सर डॉन ब्रॅडमन यांचा अपवाद वगळता दिसलेली नाहीत.

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांकडून सर्जनशिलतेची अपेक्षा करणेच चूक आहे हे सिडनी कसोटीत झालेल्या वर्णद्वेषी टीकेतून दिसून आले. पण कौतुक भारतीय संघाचे करावेसे वाटते, कारण या अशा “माइंड गेम’समोर पूर्वी भारतीय संघ ढेपाळून जायचा आता खंबिरपणे उभा राहतो, लढतो व नैतिक विजयही मिळवतो. हा सामना जरी अनिर्णित राहिला असला तरीही एकप्रकारे पाहिले तर ऑस्ट्रेलियाचा हा नैतिक पराभवच झाला असेच म्हणावे लागेल. या सामन्यामुळे ऑस्ट्रेलियाने खूप काही गमावले व भारतीय संघाने खूप काही कमावले. मायदेशात अनेक कुरापती करूनही त्यांना भारतीय संघाला पराभूत करता आले नाही. संघात रनमशिन विराट कोहली नसताना तसेच प्रमुख खेळाडूही दुखापतीने जायबंदी झालेले असताना रहाणेच्या नेतृत्वाखालील या संघाने संपूर्ण ऑस्ट्रेलियाला एक संदेश दिला की, या असल्या क्‍लृप्त्यांनी नामोहरम होणारा हा संघ नाही तर हा नव्या युगाचा संघ आहे.

जो टीकेला कामगिरीने उत्तर देतो व सामना वाचवण्यासाठी नांगर टाकून उभा राहतो. सौरव गांगुलीने भारतीय संघात आक्रमकता आणली, महेंद्रसिंग धोनीने ती रुजवली, कोहलीने त्याला आक्रमकतेचा साज चढवला तर त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्‍य रहाणेने त्याला तंत्रशुद्धतेचा मुलामा दिला. आज पुजारा आणि नंतर विहारी खेळताना जणू “द वॉल राहुल द्रविड’च फलंदाजी करत असल्याचा भास होत होता. सर गारफिल्ड सोबर्स एकदा म्हणाले होते की, कोणताही कसोटी सामना जिंकायचा असेल तर संघात सचिन तेंडुलकरसारखे फलंदाज हवेत मात्र, जर सामना वाचवायचा असेल तर द्रविडसारख्या फलंदाजांना पर्याय नाही. क्रिकेटच्या परिभाषेत या सामन्यात भारतीय संघाच्या पुजारा व विहारीने केलेल्या फलंदाजीवर काही महाभाग टीकाही करतील, पण सामन्यात जी परिस्थिती असेल त्यानुसार खेळात बदल करणे अत्यावश्‍यक असते व तेच भारताच्या फलंदाजांनी या सामन्यात केले.

राहिला प्रश्‍न ऑस्ट्रेलियाच्या माइंड गेमचा तर हत्ती चालत असताना कोणाच्या ओरडण्याचा त्रास करून घेत नसतो तर हा गजराज आपल्याच चालीने टापू पादाक्रांत करत असतो. असो, आता चौथा कसोटी सामना बाकी असून त्या सामन्यात विजय मिळवत दोन वर्षांपूर्वीच्या मालिका विजयाची पुनरावृत्ती भारतीय संघाने केली तर ते ऑस्ट्रेलियाला दिलेले सडेतोड उत्तर ठरेल यात शंका नाही. सोमवारी द्रविडचा वाढदिवसही होता आणि पुजारा, विहारी व पंत यांनी हा सामना अनिर्णित राखून आपल्या गुरूला दिलेली ही सर्वात मोठी गुरुदक्षिणाच ठरली. 

Leave a Comment