nagar | घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

नगर, (प्रतिनिधी) – घरफोडी करणार्‍या आंतरजिल्हा टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून ७४ ग्रॅम सोने व ३०० ग्रॅम चांदी असा एकूण ५ लाख ३८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांना सावेडी उपनगरातील पाईपलाइन रस्ता ते वडगाव गुप्ता गावाकडे जाणार्‍या रस्त्यावरील नातु बागेजवळून ताब्यात घेतले.

किशोर तेजराव वायाळ (वय ४२ रा. मेरा, ता. चिखली, जि. बुलढाणा), गोरख रघुनाथ खळेकर (वय ३७ रा. शिरसवाडी, ता. जि. जालना), विष्णु हरिश्चंद्र हिंगे (वय ३२ रा. चंदनझिरा कॉलनी, जालना, ता. जि. जालना) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नावे आहेत. किशोर वायाळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याच्याविरूध्द जालना, बुलढाणा, अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घरफोडीचे एकुण ५० गुन्हे दाखल आहेत.

तसेच विष्णु हिंगे याच्याविरूध्द छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये फसवणुक, जबरी चोरीचे एकुण सहा गुन्हे दाखल आहेत. गोरख खळेकर याच्याविरूध्द जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, नगर जिल्ह्यामध्ये मोक्का, दरोडा, जबरी चोरी, चोरी, फसवणुक व घरफोडीचे एकुण १८ गुन्हे दाखल आहेत.

रखमा बालाजी सुंबे (वय 57 रा. बालिकाश्रम रस्ता, नगर) यांचे 25 मे 2024 रोजी अज्ञात चोरट्यांनी घरफोडून ६६ हजाराचे सोन्या – चांदीचे दागिने चोरून नेले होते. त्यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस अंमलदार संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, संतोष लोढे, संदीप दरंदले,

संदीप चव्हाण, संतोष खैरे, प्रमोद जाधव, शिवाजी ढाकणे, अमृत आढाव, मयुर गायकवाड, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर यांचे पथक गुन्हा उघडकीस आणण्यासाठी समांतर तपास करत होते. पथकाने जिल्ह्यातील घरफोडी झालेल्या ठिकाणी भेटी देऊन घटना ठिकाणचे व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित करून ते राज्यामध्ये संशयित आरोपींची ओळख पटविणेकामी प्रसारित केले होते.

त्यानुसार सदर फुटेजमधील किशोर तेजराव वायाळ (रा. बुलढाणा) याची ओळख पटली होती. तो सोमवारी (3 जून) साथीदारांसह नगर जिल्ह्यामध्ये पुन्हा चोरी करण्यासाठी आलेला असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने त्याच्यासह साथीदार खळेकर, हिंगे यांना सावेडी उपनगरातील पाईपलाइन रस्ता ते वडगाव गुप्ता गावाकडे जाणार्‍या रस्त्यावरील नातु बागेजवळून ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे अधिक विचारपुस केली असता त्यांनी साथीदार रूद्राक्ष पवार (पुर्ण नाव नाही. रा. लाखनवाडा, ता. खामगाव, जि. बुलढाणा) याच्यासोबत नगर शहर, नेवासा, चाळीसगाव (जि. जळगाव), पैठण (जि. छ. संभाजीनगर) या ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.