#TeamIndia : कपील देव यांचा ‘रोहित-कोहली’सह सगळ्यांना सल्ला, म्हणाले “आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी वेळ असताना …”

नवी दिल्ली :- भारतीय संघातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी वेळ असताना देशांतर्गत क्रिकेटही खेळावे. एकतर त्यामुळे ते तंदुरुस्त राहतील, नवोदितांसह खेळल्याने त्यांना प्रेरणाही मिळेल व अनुभवही प्राप्त होईल, असे मत भारताचे महान कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले आहे. तसेच बीसीसीआयनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना देशांतर्गत स्पर्धेतील काही सामने खेळायला भाग पाडावे, असा सल्लाही दिला आहे.

भारतीय संघातील क्रिकेटपटू अत्यंत क्वचित देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू एखाद्या स्पर्धेत खेळत नसताना व वेळ हातात असूनही देशांतर्गत रणजी करंडक, विजय हजारे करंडक तसेच अन्य स्पर्धेत खेळत नाहीत.

भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे स्टार खेळाडू तर गेल्या कित्येक वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेट खेळलेलेच नाहीत. ते जर अशा स्पर्धांमध्ये खेळले तर त्यांच्यासह खेळत असलेल्या खेळाडूंना मोठा अनुभव मिळेल व दडपण कसे हाताळायचे याचे धडेही मिळतील, असेही कपिल म्हणाले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे, असे मागे बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नीही म्हणाले होते. मात्र, त्यांच्या बोलण्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही, ही शोकांतिका आहे. देशांतर्गत क्रिकेट खूप महत्त्वाचे आहे. कोहली, रोहित किंवा अन्य कोणत्याही वरिष्ठ खेळाडूने जवळपास देशांतर्गत क्रिकेट खेळणे सोडलेच आहे.

आशिया करंडक किंवा एकदिवसीय सामन्यांची विश्‍वकरंडक स्पर्धा लक्षात घेता देशांतर्गत स्पर्धेतील काही सामने तरी अनुभवासाठी खेळायला हवे होते. या अव्वल खेळाडूंनी देशांतर्गत सामने चांगले खेळले पाहिजेत, जेणेकरून पुढील पिढीच्या खेळाडूंना त्यांच्याकडून शिकायला मदत होईल. जर त्यांचे अनुभव युवा खेळाडूंना मिळाले तर त्यांना त्यातून शिकायला मिळेल, असेही कपिल यांनी म्हटले आहे.

बॅझबॉलचाही सराव करा…

इंग्लंडचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये बॅझबॉल नावाचा एक प्रकार करतो. खरेतर हा प्रकार म्हणण्यापेक्षा त्याला कसोटीतील पिंचहिटर फलंदाजी असेच म्हटले गेले पाहिजे. एकदिवसीय सामन्यांत पूर्वी एका बाजूने फलंदाज बाद होत असले तरीही पिंचहिटरला फलंदाजीला पाठवून त्याला प्रत्येक चेंडूवर आक्रमक फलंदाजी करण्यासाठीच पाठवले जात होते. तोच प्रकार आता इंग्लंडचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये करत आहे व त्यात यशस्वीही होताना दिसत आहे. तोच प्रकार आता केवळ भारतीय संघानेच नव्हे तर जगातील सर्व संघांनी करून पहायला हरकत नाही, असेही कपिल यांनी सांगितले.

रोहित व कोहलीने टी-20 पासून दूर व्हावे…

रोहित शर्मा व विराट कोहली यांचे वय पाहता आता त्यांनी नवोदितांसाठी किमान टी-20 संघातील जागा तरी उपलब्ध करून द्यावी. आजवर त्यांनीही खूप टी-20 क्रिकेट खेळले आहे. मात्र, आता नवोदित खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत, अशा वेळी त्यांनाच जास्त संधी मिळणे गरजेचे आहे. रोहित व कोहलीने एकदिवसीय तसेच कसोटी क्रिकेटवरच लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा सल्लाही कपिल यांनी दिला.