#INTERNATIONALWOMENDAY2022 : उपक्रमशील शिक्षिका पूनम भुजबळ

सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या सौ. पूनम विजयकुमार भुजबळ यांनी शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. गेल्या 13 वर्षांच्या कार्यकाळात प्राथमिक शिक्षिका म्हणून सौ. भुजबळ यांनी केलेले काम अनुकरणीय आहे. करोना संकटातही विविध उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थी- पालक यांच्याशी संवाद साधत त्यांना आधार देण्याचे काम केले. करोना महामारीच्या काळात विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली.

रहिमतपूर येथे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या पूनम यांनी बी. ए. डी. एड. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मार्च 2009 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुर्लीमळा (ता. कोरेगाव) येथे शिक्षण सेवक म्हणून सेवेस प्रारंभ केला. दहा वर्षे शिक्षण सेवा केल्यानंतर जून 2019 मध्ये जिल्हा परिषद शाळा पानाडेवाडी (ता. माण) या दुर्गम भागातील द्विशिक्षकी शाळेत सौ. पूनम भुजबळ यांनी काम केले. वाहतुकीच्या सोयींचा अभाव असतानाही दुचाकीवर जाऊन त्यांनी शाळेची प्रगती केली. शिक्षण क्षेत्रात झोकून देवून त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. सप्टेंबर 2019 मध्ये सौ. पूनम यांची जिल्हा परिषद शाळा वाठार किरोली नंबर 2 येथे बदली झाली.

ही शाळा मोठी असल्याने सहकारी शिक्षकांच्या मदतीने त्यांनी अनेक गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवत शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास हातभार लावला. शाळांतर्गत काव्यगायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, फुलांचे प्रदर्शन, सामान्यज्ञान प्रश्‍नमंजुषा स्पर्धा राबवून त्यांनी मुलांमध्ये नवचेतना निर्माण केली. करोनाच्या काळात शाळा बंद असतानाही ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून सौ. पूनम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद ठेवला. पालकांच्या गृहभेटी घेऊन विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण देऊन त्यांच्या अडचणी, शंका दूर केल्या. गावामध्ये करोनाबाबत जनजागृती केली. करोना सर्वेक्षण, लसीकरण आदी कार्यातही हिरीरीने सहभाग घेतला. समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून सौ. पूनम भुजबळ यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले.

सौ. पूनम यांचे पती विजयकुमार भुजबळ हे सुभाषनगर ता. कोरेगाव येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. कन्या शौर्या यांच्यासमवेत गडकिल्ल्यांचे ट्रेकिंग करुन निसर्गाचा मनमुराद आनंद घेत अनेक किल्ल्यांना भेटी दिल्या. 13 वर्षाच्या शैक्षणिक सेवेसाठी कुटुंबीय, सहकारी शिक्षकांचे सहकार्य, मार्गदर्शन मिळाले. अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघाद्वारे आचार्य दादासाहेब दोंदे गौरव सन्मानचिन्ह व प्रमाणपत्राने सौ. पूनम यांचा गौरव झाला आहे. महिलांनी केवळ चूल व मूल यामध्ये न अडकता स्वत:साठी मनसोक्त जगावे. स्वत:ची शैक्षणिक पात्रता वाढवून त्याचा उपयोग समाजसेवेसाठी करावा. स्वत:ची आवड, छंद जोपासून आनंदी जीवन जगा, असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.