#INTERNATIONALWOMENDAY2022 : महिलांना स्वावलंबी करणारी तेजस्विनी सारिका पवार

मनामध्ये इच्छाशक्‍ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही. यासाठी गरज आहे जिद्दीची, जिद्दीच्या जोरावर कुटुंब, समाज यांच्या साथीने तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भरतेचे धडे देणारी सारिका किरण पवार महिलांसाठी खऱ्या अर्थाने तेजस्विनी बनवून प्रेरणादायी ठरल्या आहेत.महिला दिनानिमित्त दैनिक प्रभातच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा…

महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सुनंदा रामभाऊ दाभाडे, मंदाताई पिलाजीराव जाधवराव, प्रियांका सुशील कोलते, संजीवनी सर्जेराव वाघमारे, गायत्री विजय शिंदे, कविता संदीप धायबर, विद्या जगदीश जोशी या सगळ्यांच्या साथीने दिवसरात्र मेहनत करून बचतगटाची उभारणी करून गोरगरीब, निराधार महिलांना आधार देण्यासाठी तेजस्विनी सामाजिक संस्थेची उभारणी करण्यात आली.

या सामाजिक संस्थेला वेळोवेळी मदत करणारे आणि संस्थेच्या उत्कर्षासाठी सतत कार्यरत राहणारे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे हे या संस्थेचे खरे मार्गदर्शक व आधारस्तंभ बनले आहेत. ज्येष्ठांचा अनुभव आणि घरातील व्यक्‍तींच्या पाठबळामुळे महिलांना बचत गटाच्या व इतर व्यवसायाभिमुख शिक्षण घेऊन स्वावलंबी करण्यासाठी व हजारो महिलांच्या संसाराचा गाडा रुळावर आणण्यासाठी सारिका पवार यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा संस्थेचा मुख्य हेतू आहे. तेजस्विनी सामाजिक संस्थेने कार्यक्षेत्रात बचत गटांची निर्मिती केली आहे.बचत गटात राबवलेल्या योजनांचा लाभ गरजू महिलांना झाला आहे. दरवर्षी सामाजिक संस्थेला शेकडो महिला या निमित्ताने जोडल्या गेल्या आहेत. त्यांचे संघटन करून त्यांना बचतीची सवय लावून ही संस्था वेगवेगळे कार्य करून आज अखेरपर्यंत गेली आहे. शासनाच्या तसेच संस्थेच्या मार्फत विविध चाललेल्या योजनांचा फायदा अनेक महिलांनी घेतला आहे. संस्थेच्या वतीने महिलांना संघटन करून आज अखेरपर्यंत अनेक बचतगट उभे राहिले आहेत.

संस्थेमध्ये जवळपास 500 पेक्षा अधिक बचत गट असून तीन हजारपेक्षा जास्त महिला संघटित झाल्या आहेत. बचत गटासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या प्रत्येक उपक्रमातून महिला स्वावलंबी करणे आणि महिलांना आत्मनिर्भरतेचे धडे देणे हा एकमेव उद्देश असून यासाठी महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सारिका पवार यांचा सिंहाचा वाटा आहे.

शिक्षणाची दारे खुली केली
तेजस्विनी सामाजिक संस्थेने गरीब व गरजू मुलांसाठी प्री-प्रायमरी नावाने इंग्रजी माध्यमाची शाळादेखील सुरू केली आहे. या शाळेत गरीब व गरजू पालकांच्या मुलांना अत्यंत कमी फीमध्ये शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. शाळांमधून विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवून सर्वधर्मसमभावाची शिकवण संस्थेने विद्यार्थ्यांना दिली आहे. शाळेतील विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यामध्ये व या कार्यक्रमातून शाळेचे वेगळेपण समाजात सिद्ध करण्यासाठी व थोरामोठ्यांचा आशीर्वाद व अनेक संस्कारांचे पैलू विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सारिका पवार नेहमीच अग्रेसर असतात.

आरोग्याबाबत विशेष जनजागृती
तेजस्विनी सामाजिक संस्था आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करीत आहे. संस्थेने आजतागायत विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच अनेक उपक्रम शहरापासून खेड्यापर्यंत राबवले आहेत. यात नेत्रतपासणी, आहारतज्ज्ञ बोलावून त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले आहे. संस्थेने स्त्रियांमधील आरोग्य आणि स्वच्छता याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी कार्य केले आहे. परिसरातील दारिद्य्र रेषेखालील तसेच अल्प उत्पन्न गटातील अनेक रुग्णांना संस्थेच्या माध्यमातून आरोग्य वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सारिका पवार यांनी मोलाची मदत व सहकार्य केले आहे. वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच आरोग्यदायी सवयी लावण्यासाठी आणि जनजागृतीपर चर्चासत्र, आरोग्य शिबिरांचे आयोजन करून 2014 पासून आजपर्यंत दहा हजार नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे.

नाममात्र शुल्कात रोजगार शोधण्यास मदत
सारिका पवार यांनी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते महिला सक्षमीकरण केंद्र, शिवभोजन केंद्र व अथर्व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन करण्यात आले. या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याच्या हेतूने विविध प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करून आत्मनिर्भरतेचे धडे दिले आहेत. याशिवाय सामान्य नागरिकांना शासनाच्या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी शिवभोजन थाळी केंद्राची उभारणी करून सामान्य नागरिकांची भूक भागवली आहे. नागरिकांच्या आरोग्याचे संवर्धन होण्यासाठी अथर्व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून नाममात्र शुल्कात त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

मोफत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

बदलत्या काळाच्या आणि उत्तम आरोग्य लाभावे यासाठी महिला व मुलींसाठी 14 वा वित्त आयोग आणि महिला बालकल्याण यांच्या विविध योजना अंतर्गत तसेच वाघोली ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून मोफत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन सारिका पवार यांनी आपल्या संस्थेमार्फत वेळोवेळी केले आहे. प्रशिक्षणातून महिलांना आपल्या पायावर उभे राहावे व उद्योग व्यवसायात भरारी घेऊन कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा यासाठी ब्युटी पार्लर, जीएसटी मेकअप, आर्टिस्ट आदी प्रशिक्षण वर्गांचे प्रशिक्षण संस्थेमार्फत दिले आहे. महिलांना ब्युटी पार्लर, टेलरिंग, केक बनवणे, संगणक आदींचे मोफत प्रशिक्षण साई सत्यम पार्क, कावडे वस्ती, गोरेवस्ती आदी भागात प्रशिक्षण वर्ग आयोजित करून दिले आहे.

विशेष सन्मान

महिला सक्षमीकरण करण्याच्या चळवळीत कार्य केल्याबद्दल छत्रपती संभाजी महाराज यांच्या 340 व्या राज्याभिषेकदिनी श्रीक्षेत्र तुळापूर येथे झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सारिका पवार यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. याशिवाय याच कार्याची दखल घेऊन दैनिक प्रभातच्या वतीने 8 मार्च 2020 रोजी सुपर वुमन सन्मान देऊन देखील गौरवण्यात आले आहे.

सामाजिक जाणिवेचा मूलमंत्र
तेजस्विनी सामाजिक संस्थेचे आधारस्तंभ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते रामभाऊ दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे अध्यक्षा सारिका पवार व इतर संचालक मंडळाने करोना कालावधीत गोरगरीब व गरजू लोकांना अन्नधान्य किटचे वाटप तसेच सकाळ व संध्याकाळ बारा हजार नागरिकांना मोफत जेवणाची सुविधा संस्था, ग्रामपंचायत, दानशूर मंडळी तसेच रामभाऊ दाभाडे प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आली आहे. रामभाऊ दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त साडेचार हजार नागरिकांना धान्यवाटप देखील संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. संस्थेच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याचे संवर्धन करण्याच्या हेतूने संस्थेत मास्क बनवून जवळपास पाच हजार मास्कचे वाटप करण्यात आले आहे.

कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या कालावधीत आरोग्यदायक सवयी लागाव्यात यासाठी नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे देखील वाटप करण्यात आले आहे. कोकण कोल्हापूर परिसरातील पूरग्रस्तांना अन्नधान्य, कपडे व इतर साहित्यांचे वाटप करून संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. याशिवाय अन्नधान्यांचे व गृहोपयोगी साहित्यांची 500 किट कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी वाटप करून सामाजिक जाणीव वृद्धिंगत ठेवण्यात सारिका पवार यांना यश आले आहे. या कार्याची दखल राष्ट्रवादीचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी घेतली असून सारिका पवार व त्यांच्या संस्थेचे कौतुक केले आहे.

व्यवसायाभिमुख समाजोन्नतीचा ध्यास…
तेजस्विनी संस्थेच्या अध्यक्षा सारिका पवार यांनी आपल्या भागातील महिलांना विविध व्यवसायाबाबत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने योग्य मार्गदर्शन व व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणातून त्या व्यवसायात येणाऱ्या अडचणी आणि उपलब्ध बाजारपेठ याबाबतचे ज्ञान महिलांना संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याने अनेक महिलांचे व्यवसाय खऱ्या अर्थाने उभे राहिले आहेत. त्याशिवाय महिला सबलीकरण धोरण यशस्वीपणे राबवण्यात त्यांना यश आले. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पवार यांनी कार्य केले. सर्वसामान्य महिलांना घेऊन आधुनिक यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाच्या मदतीने संस्थेचे कामकाज सध्या गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधून यशस्वीपणे सुरू आहे. तसेच या राज्यातील महिलांदेखील संस्थेला संलग्न झाल्या आहेत.

शब्दांकन-
दत्तात्रय गायकवाड
हवेली तालुका प्रतिनिधी