“साखर उद्योगात संशोधनासाठी गुंतवणूक करावी”; शरद पवार यांचे मत

“डेक्‍कन शुगर टेक्‍नॉलॉजिस्ट असोसिएशन’च्या वार्षिक परिषदेचे उद्‌घाटन

पुणे – साखर उत्पादनात जागतिक क्रमवारीत भारत अग्रेसर आहे. तर देशात महाराष्ट्र राज्याचा पहिला क्रमांक आहे. साखर उद्योगाशी संबंधित सर्व स्तरांना संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड सातत्याने दिली पाहिजे. साखर निर्मिती उद्योगात जागतिक पातळीवर आपले स्थान आबाधित राखण्यासाठी साखर उद्योगात संशोधन करण्यासाठी गुंतवणूक करण्याची मानसिकता बाळगली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

डेक्कन शुगर टेक्‍नॉलॉजिस्ट असोसिएशन (डीएसटीए) या साखर उद्योग क्षेत्रातील अग्रणी संस्थेतर्फे आयोजित 67 व्या वार्षिक परिषदेचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी आमदार कल्लाप्पाण्णा आवाडे, कानपूर येथील राष्ट्रीय साखर संस्थेचे संचालक नरेंद्र मोहन, साखर आयुक्त शेखर गायकवाड, डीएसटीएचे अध्यक्ष श्रीपाद गंगावती, उपाध्यक्ष एस. बी. भड, कर्नाटकचे उपाध्यक्ष सोहन शिरगावकर आदी
उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले की, साखर निर्मिती उद्योगामध्ये संशोधन आणि तंत्रज्ञानाची भूमिका अतिशय महत्त्वाची असून, त्याचा उपयोग या उद्योग प्रक्रियेतील प्रत्येक छोट्या घटकाला होणे आवश्‍यक आहे. साखर उद्योगाला अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो. अगदी मान्सूनपासून दुष्काळ, पूर, कीड, भारनियमन, हमीभाव अशा प्रत्येक टप्प्यावर येत असलेल्या संकटांचा विचार करून तरूण पिढीने यावर उपयुक्त असे संशोधन करावे.

कृषी उत्पादनात साखर निर्यातीत महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या आपल्या देशाने पर्यावरणाच्या दृष्टीने देखील योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. प्रदूषणाचा वाढता विळखा लक्षात घेऊन इथेनॉल निर्मिती प्रकल्पांना देखील अधिक चालना दिली पाहिजे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राचा इतिहास
साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की, जागतिक पातळीवरील साखर निर्मितीत पहिल्या क्रमांकाचा देश म्हणून भारताने स्थान मिळवले आहे. या क्रमवारीत भारत पहिल्या स्थानावर असून, ब्राझील दुसऱ्या, तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे. जागतिक पातळीवरील देशांच्या क्रमवारीत चीन, रशिया, थायलंड या देशांना मागे टाकून एखाद्या देशातील राज्याने स्थान मिळवण्याचा इतिहास महाराष्ट्राने रचला आहे. 15 सप्टेंबर 2022 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 42 हजार 600 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.