IPL 2021 : दिल्लीची विजयी घोडदौड सुरूच

अबुधाबी -ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. राजस्थान रॉयल्सचा 33 धावांनी पराभव करत गुणतालिकेत पुन्हा पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दिल्लीचा 10 सामन्यातील हा आठवा विजय असून त्यांनी एकूण 16 गुणांसह अंतिम-चारमध्ये निश्‍चित केला आहे.

दिल्लीने दिलेल्या 155 धावांच्या माफक लक्ष्याच्या प्रत्युत्तरात राजस्थान 20 षटकांत 6 बाद 121 धावांपर्यतच मजल मारू शकला. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने नाबाद 70 धावांची झुंझार खेळी केली. परंतु इतर फलंदाज अपयशी ठरल्याने त्यांना मोठया पराभवाला सामोरे जावे लागले.

राजस्थानचा कर्णधार सॅमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय रॉयल्सच्या गोलंदाजांनी सार्थकी लावला आणि दिल्लीच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. प्रत्युत्तरात लिअम लिविंगस्टोन आणि यशस्वी जयस्वालची जोडी सलामीला उतरली. पण पहिल्याच षटकात आवेश खानने लिविंगस्टोनला एका धावेवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

त्यानंतर पुढील षटकात जयस्वाल माघारी परतला. चौथ्या स्थानावर बढती मिळालेला डेविड मिलरही प्रभावी खेळी करू शकला नाही. यानंतर कर्णधार सॅमसन अखेरपर्यत तग धरून खेळत राहिला, पण संघाला विजयीरेषा ओलांडून देण्यास अपयशी ठरला.

तत्पूर्वी, राजस्थानच्या युवा गोलंदाजांनी आज भेदक गोलंदाजीचे दर्शन घडवले आणि दिल्लीला मोठी धावसंख्या गाठू दिली नाही. दिल्लीकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 43 धावा केल्याने 20 षटकांत 6 बाद 154 धावा केल्या. मुस्तफिजूर रहमान आणि चेतन सकारियाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर तेवतिया आणि कार्तिक त्यागीने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.