IPL वर करोनाची पुन्हा वक्रदृष्टी; हैद्राबादचा नटराजन ‘पॉझिटिव्ह’

दुबई – देशात करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने रौद्ररूप धारण केल्याने या वर्षी मे महिन्यामध्ये आयपीएल स्पर्धा अर्ध्यावर बंद करावी लागली होती. या श्रुंखलेतील उर्वरित सामने आता दुबई येथे हलवण्यात आले असून यातील पहिला सामना १९ सप्टेंबरला खेळवण्यात आला. स्पर्धा नुकतीच सुरु झाली असतानाच आता पुन्हा एकदा करोना विषाणू संकटाने तोंड वर काढले आहे.

हैद्राबाद संघाचा खेळाडू टी नटराजन याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज हैद्राबाद व दिल्ली संघादरम्यान सामना होणार असून त्यापूर्वी केलेल्या नियोजित करोना  चाचणीमध्ये नटराजन पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. नटराजन याला सध्या करोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नसून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

त्याच्या संपर्कातील ६ जणांना देखील विलगीकृत करण्यात आलं आहे. आयपीएलतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार आजचा दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यादरम्यान होणार सामना नियोजित वेळेवर खेळवण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

जवळच्या संपर्कातील आणि इतरांची आरटीपीसीआर टेस्ट केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सामना खेळवण्यात येणार असल्याचंही आयपीएलतर्फे सांगण्यात आले आहे.