#IPL2022 : आयपीएल 2022 मध्ये कोरोनाचा शिरकाव, दिल्ली कॅपिटल्सचा ‘हा’ सदस्य पॉझिटिव्ह

मुंबई – आयपीएलच्या 15 व्या हंगामात कोरोनाने प्रवेश केला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये समाविष्ट असलेले फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. आयपीएलने याबाबत एक निवेदन जारी करून माहिती दिली आहे.

शनिवारी (16 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळणार आहे.  हा सामना रद्द केला जाऊ शकतो अशा बातम्या सोशल मीडियावर येत आहेत, परंतु आयपीएलने याबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. आयपीएलने म्हटले – दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्सचे वैद्यकीय पथक त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे.

पॅट्रिक फरहार्ट दिल्ली कॅपिटल्सच्या सर्व खेळाडूंच्या संपर्कात होते. अशा परिस्थितीत सर्व खेळाडूंची कोविड चाचणी करण्यात आली आहे. चाचणीत इतर कोणाला संसर्ग झाल्याचे आढळल्यास त्यालाही वेगळे केले जाईल. त्याच वेळी, अधिक खेळाडूंना संसर्ग झाल्यास, सामना पुढे ढकलला जाऊ शकतो. त्यामुळं आयपीएलच्या 15 व्या पर्वावरही कोरोनाचं संकट येण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षीही बायो-बबलमध्ये कोरोनाची नोंद झाल्यानंतर अनेक प्रकरणे समोर आली होती. त्यानंतर बीसीसीआयने आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. नंतर दुसऱ्या टप्प्याचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले होते.

या हंगामातील दिल्ली कॅपिटल्सच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, संघाने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने दोन सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत. दिल्लीने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. त्यानंतर गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला. दिल्लीने त्यांच्या मागील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला होता. गुणतालिकेत ऋषभ पंतचा संघ चार सामन्यांतून चार गुणांसह सातव्या स्थानावर आहे.