IPL 2022 #SRHvRR : राजस्थानचा दणदणीत विजय

पुणे -आक्रमक फलंदाजीनंतर भेदक गोलंदाजी करत राजस्थानने आयपीएल स्पर्धेत सोमवारी झालेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादचा 61 धावांनी उव्वा उडवला. विजयासाठी 211 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या फलंदाजांना राजस्थानच्या गोलंदाजांचा सामना करणेच कठीण बनले. कर्णधार केन विल्यमसनला प्रसिध कृष्णाने 2 धावांवर बाद केले व त्यानंतर त्यांच्या डावाला गळतीच लागली. राहुल त्रिपाठीलाही कृष्णानेच तंबूचा रस्ता दाखवला.

दुसऱ्या बाजूने यजुवेंद्र चहलने अभिषेक शर्माचा अडसर दूर केला. यावेळी हैदराबादची स्थिती 3 बाद 9 अशी दयनिय बनली होती. निकोलस पूरनला ट्रेन्ट बोल्टने खाते उघडण्यापूर्वीच पायचीत बाद केले. त्यानंतर चहलने अब्दुल समदलाही 4 धावांवर परतवले. यावेळी हैदराबादचा निम्मा संघ अवघ्या 37 धावांत बाद झाला होता. त्यानंतर रोमारीओ शेफर्डने थोडी चमक दाखवली. चहलने त्याला 24 धावांवर त्रिफळाबाद केले.

मार्करमला सुरेख साथ देत वॉशिंग्टन सुंदरने अवघ्या 14 चेंडूत 40 धावा फटकावल्या. मात्र, तो देखील अनावश्‍यक फटका मारत बाद झाला. मार्करमने आपले अर्धशतक पूर्ण केले मात्र, त्याला अन्य फलंदाजांनी साथ न दिल्यामुळे त्यांना 61 धावांनी पराभव पत्करावा लागला. हैदराबादचा डाव 20 षटकांत 7 बाद 149 धावावंर रोखत राजस्थानने मोठा विजय प्राप्त केला. मार्करम 41 चेंडूत 5 चौकार व 2 षटकार फटकावत 57 धावांवर नाबाद राहिला. राजस्थानकडून यजुवेंद्र चहलने 3 गडी बाद केले. प्रसिध कृष्णा व ट्रेन्ट बोल्ट यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

तत्पूर्वी, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन, शेमरन हेटमायर यांच्यासह देवदत्त पडीक्कल, जोस बटलर व यशस्वी जयस्वाल यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर राजस्थानने 20 षटकांत 6 गडी गमावून 210 धावांचा डोंगर उभा केला. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने राजस्थानला पहिल्यांदा फलंदाजी दिली. बटलर व जयस्वाल यांनी अर्धशतकी सलामी दिली. जयस्वाल 16 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावून 20 धावांवर परतला. बटलर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात 3 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 35 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार सॅमसनने पडीक्कलसह संघाला दीडशतकी मजल मारुन देताना वादळी फलंदाजी केली.

पडीक्कल 4 चौकार व 2 षटकारांची आतषबाजी करुन 41 धावांवर परतला. सॅमसनने आपले अर्धशतक थाटात पूर्ण केले. मात्र, त्यानंतर तो लगेचच बाद झाला. त्याने आपल्या 55 धावांच्या खेळीत 27 चेंडूत 3 चौकार व 5 षटकारांची बरसात केली. त्यानंतर हेटमायरनेही आक्रमक फलंदाजी करत 13 चेंडूत 2 चौकार व 3 षटकार फटकावताना 32 धावांची खेळी करताना संघाच्या द्विशतकी धावा फलकावर लावल्या. हैदराबादकडून उमरान मलिक व टी. नटराजन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक –

राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 6 बाद 210 धावा. (संजू सॅमसन 55, देवदत्त पडीक्कल 41, जोस बटलर 35, शेमरन हेटमायर 32, यशस्वी जयस्वाल 20, उमरान मलिक 2-39, टी. नटराजन 2-43, भूवनेश्‍वर कुमार 1-29, रोमारिओ शेफर्ड 1-33). सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 7 बाद 149 धावा. (वॉशिंग्टन सुंदर 40, रोमारीओ शेफर्ड 24, एडन मार्करम नाबाद 57, भूवनेश्‍वर कुमार नाबाद 3, यजुवेंद्र चहल 3-22, प्रसिध कृष्णा 2-16, ट्रेन्ट बोल्ट 2-22).