IPL 2024 (RCB vs RR Eliminator) : एलिमिनेटर सामन्यात आज बंगळुरू-राजस्थान आमने-सामने, जो हरेल तो थेट घरी जाईल…

RCB vs RR Eliminator Match : आयपीएल IPL 2024 मध्ये प्लेऑफ सामने सुरू झाले आहेत. मंगळवारी क्वालिफायर-1 हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाताने हैदराबादचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याचवेळी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ आज (22 मे ,संध्याकाळी 7.30 वाजता) एलिमिनेटर सामन्यात आमनेसामने येतील.

शेवटच्या वेळी 2015 मध्ये हे दोन संघ एलिमिनेटर सामन्यात आमनेसामने आले होते. त्यावेळी ही लढत एकतर्फी झाली होती. त्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 180 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ 109 धावा करून सर्वबाद झाला. अशा स्थितीत राजस्थान रॉयल्सवर यावेळीही दडपण असणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग 6 सामने जिंकून प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सला गेल्या 5 सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. अशा स्थितीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला एलिमिनेटर सामन्यात आपला वेग कायम राखायचा आहे.

केवळ अंतिम सामन्यासाठीच राखीव दिवस …

क्रिकेट चाहत्याच्या माहितीसाठी क्वालिफायर-1, क्वालिफायर-2 आणि एलिमिनेटर सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. केवळ अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. आयपीएल 2024 चा अंतिम सामना रविवार, 26 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. आयपीएल 2024 फायनलच्या राखीव दिवसाबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही, परंतु मागील हंगामात चेन्नई सुपर किंग्स आणि जीटी यांच्यातील अंतिम सामना राखीव दिवशी खेळला गेला होता. अशा परिस्थितीत या हंगामातही अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस असेल.

प्लेऑफसाठी आयपीएलचे नियम…

पावसामुळे या मोसमात आतापर्यंत 3 सामने रद्द झाले आहेत. 3 मे रोजी गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर 16 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामनाही पावसामुळे वाहून गेला होता. साखळी फेरीतील शेवटचा सामनाही पावसामुळे होऊ शकला नाही. क्वालिफायर-1, क्वालिफायर-2 आणि एलिमिनेटर सामन्यांमध्ये पावसाने व्यत्यय आणल्यास, किमान पाच षटकांचा सामना खेळवण्यात येईल. पाच षटकांचा सामना शक्य नसल्यास सुपर ओव्हरद्वारे सामन्याचा निकाल लावला जाईल. जर अशी परिस्थिती उद्भवली की सुपर ओव्हर देखील होऊ शकत नाही, तर पॉइंट टेबलमधील स्थान/रँकिंगच्या आधारावर निर्णय घेतला जाईल.

IPL 2024 (KKR vs SRH Qualifier 1) : कोलकाताने गाठली अंतिम फेरी, हैदराबादचा 8 गडी राखून केला पराभव…

आरसीबीला बसणार मोठा फटका… 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील एलिमिनेटर सामनाही पावसामुळे रद्द झाला तर गुणतालिकेत दोन्हीपैकी जो संघ वरच्या स्थानावर राहिला होता, तो संघ दुसरा क्वालिफायर खेळण्यासाठी पात्र ठरेल. त्याचबरोबर दुसरा संघ बाहेर पडेल. या नियमामुळे आरसीबीला मोठा फटका बसणार आहे. जर सामना रद्द झाला, तर आरसीबी संघ बाहेर पडेल आणि राजस्थान रॉयल्स पुढच्या फेरीत म्हणजे दुसरा क्वालिफायर सामना खेळेल.