IPL 2024 ( KKR vs RCB Match 36) : साल्टच्या वादळानंतर श्रेयसचे अर्धशतक; कोलकाताचे आरसीबीसमोर ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य…

IPL 2024, Live Cricket Score, KKR vs RCB :  आज, आयपीएल 2024 च्या 36 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आमने-सामने आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. केकेआरने या मोसमात आरसीबीचा पराभव केला होता आणि ते त्यांची लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील, तर चालू हंगामात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या आरसीबीला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी विजयाची नोंद करणे आवश्यक आहे.

ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर 223 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकांत 6 बाद 222 धावा केल्या. केकेआरकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 50 धावांची खेळी खेळली.

तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी 4.2 षटकात 56 धावा जोडल्या. 14 चेंडूत 48 धावांची तुफानी इनिंग खेळून फिल सॉल्ट मोहम्मद सिराजचा बळी ठरला. यानंतर विकेट पडण्याची प्रक्रिया सुरू झाली. 15 चेंडूत 10 धावा करून सुनील नरेनला यश दयालने बाद केले. अंगकृश रघुवंशी 4 चेंडूत 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. व्यंकटेश अय्यरने 8 चेंडूत 16 धावांचे योगदान दिले. काही वेळातच केकेआरचे 4 फलंदाज 97 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले होते.

श्रेयस अय्यर आणि रिंकू सिंग यांनी डाव सावरला, पण नंतर…

यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिंकू सिंगने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण रिंकू सिंग 16 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. कोलकाता नाईट रायडर्सला 137 धावांवर पाचवा धक्का बसला. श्रेयस अय्यरने एक बाजू लावून धरली असली तरी दुसरीकडे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. श्रेयस अय्यरने 36 चेंडूत 50 धावा केल्या आणि कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. मात्र, अखेरच्या षटकांमध्ये रमणदीप सिंग आणि आंद्रे रसेल यांनी स्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन केले. दोन्ही फलंदाजांनी शेवटच्या 16 चेंडूत 43 धावा जोडल्या. रमणदीप सिंगने 9 चेंडूत 24 धावा केल्या. तर आंद्रे रसेल 20 चेंडूत 27 धावा करून नाबाद परतला.

IPL 2024 : रोहित शर्मानं Impact Player Rule वर केली टीका, म्हणाला ” क्रिकेटसाठी मोठा धोका असून मला…”

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांची अवस्था…

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे तर यश दयाल आणि कॅमेरून ग्रीन यांना प्रत्येकी 2 यश मिळाले. याशिवाय मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.