#IPL2020 : राजस्थानचा हैदराबादवर रॉयल विजय

दुबई – राहुल तेवतिया व रियान पराग यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 गडी राखून सहज पराभव केला. विजयासाठी हैदराबादने ठेवलेले 159 धावांचे आव्हान राजस्थानने 19.5 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 163 धावा करत सहज पार केलं आणि दमदार विजय साकारला. राहुल तेवतिया सामन्याचा मानकरी ठरला.

विजयासाठी 159 धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. संघाची धावसंख्या 26 असताना त्यांचे प्रमुख 3 फलंदाज बेन स्टोक्स 5(6), स्टिव्ह स्मिथ 5(6) आणि जोस बटलर 16(13)  माघारी परतले होते. त्यानंतर राॅबिन उथप्पा आणि संजू सॅमसन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, राशिद खानने उथप्पाला 18(15) धावांवर बाद करत राजस्थानला चौथा धक्का दिला. 
 
त्यानंतर संजू सॅमसनलाही राशिद खानने पायचित केले. संजू सॅमसनने 26(25) धावा केल्या. सॅमसन बाद झाला तेव्हा राजस्थानच्या 5 बाद 78 धावा झाल्या होत्या आणि विजयासाठी 48 चेंडूत 79 धावांची गरज होती. मात्र, रियान परागने 26 चेंडूत नाबाद 42 आणि राहुल तेवतियाने 28 चेंडूत नाबाद 45 धावा करत संघाचा विजय साकारला. हैदराबादकडून गोलंदाजीत खलील अहमद आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. अहमदने 3.5 षटकांत 37 तर राशिद खानने 4 षटकांत 25 धावा दिल्या.

तत्पूर्वी, हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वाॅर्नर याने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता . त्यानंतर हैदराबादने 20 षटकांत 4 बाद 158 धावसंख्यपर्यंत मजल मारली होती. हैदराबादची सुरुवात खराब झाली. संघाची धावसंख्या 23 असताना कार्तिक त्यागीने जाॅनी बेअरस्टोला संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. जाॅनी बेअरस्टो 16(19) धावांवर बाद झाला. त्यानंतर डेव्हिड वाॅर्नर आणि मनीष पांडे यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी 73 धावा जोडल्या. जोफ्रा आर्चरने डेव्हिड वाॅर्नरला त्रिफळाचित करत हैदराबादला दुसरा धक्का दिला. वाॅर्नरने 38 चेंडूत (3 चौकार व 2 षटकार) 48 धावा केल्या.
त्यानंतर मनीष पांडेने आपले अर्धशतक पूर्ण केलं. तसेच त्याने आयपीएल स्पर्धेतील आपल्या 3000 धावादेखील पूर्ण केल्या. मनीष पांडेला जयदेव अनादकटने राहुल तेवतियाकरवी झेलबाद करत हैदराबादला तिसरा धक्का दिला. 
 
मनीष पांडेने 44 चेंडूत (2 चौकार व 3 षटकार)  सर्वाधिक 54 धावा केल्या. त्यानंतर केन विलियमसनने 12 चेंडूत ( 2 षटकार) नाबाद 22 आणि प्रियम गर्गने 8 चेंडूत ( 1 चौकार व 1 षटकार) 15 धावा करत संघाची धावसंख्या 20 षटकांत 158 पर्यंत नेली.
 
राजस्थानकडून जोफ्रा आर्चर (4 षटकात 25 धावा), कार्तिक त्यागी (3 षटकात 29 धावा) आणि जयदेव उनादकट (4 षटकात 31 धावा) यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. श्रेयस गोपलने 4 षटकात 31 तर राहुल तेवतियाने 4 षटकात 35 धावा दिल्या.

Leave a Comment