#IPL2022 | सीव्हीसी लांबल्यामुळे लिलावही लांबणीवर

मुंबई – अहमदाबाद संघाच्या सीव्हीसी ओनरशिपसंदर्भात विशेष समितीने अद्याप निर्णय दिलेला नाही. त्यामुळेच पुढील वर्षीच्या स्पर्धेपूर्वी होणारा लिलाव देखील पुढे ढकलावा लागणार आहे, असे बीसीसीआयने जाहीर केले आहे. पुढील वर्षीच्या मोसमात अहमदाबाद व लखनौ हे दोन नवे संघ सहभागी होणार आहेत. त्याच्या सीव्हीसी ओनरशिपसंदर्भात विशेष समिती निर्णय घेणार असून जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत लिलाव होऊ शकत नाही, असेही सांगण्यात येत आहे.

बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काउंसिल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मेगा लिलाव प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रयत्नशील होते. पण यासंदर्भात आता बीसीसीआयचे वेळापत्रक बदलणार आहे. मेगा लिलाव प्रक्रिया जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्याच्या आधी होणे कठीण आहे. बीसीसीआयने सहभागी संघांना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मेगा लिलाव प्रक्रिया होणार असल्याची माहिती दिली आहे.

पण या नियोजनात बदल होण्याची शक्‍यता आहे. अहमदाबाद संघाबाबतच्या मुद्यावर अंतिम स्वरुप देण्याच्या कारणास्तव लिलाव प्रक्रिया जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलावी लागू शकतो. अद्याप अहमदाबाद संघाच्या सीव्हीसी ओनरशिपसंदर्भात विशेष समितीच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. त्यांचा निर्णय आल्याशिवाय मेगा लिलावाच्या तारखा स्पष्ट होऊ शकत नाही, असेही बीसीसीआयकडून सांगण्यात येत आहे.

आगामी आयपीएल स्पर्धेत लखनौ आणि अहमदबाद हे दोन नवे संघ सहभागी होणार आहेत. लिलावापूर्वी या नव्या संघाना तीन खेळाडू निवडण्यासाठी विंडो उपलब्ध करुन द्यावी लागेल. ही प्रक्रिया जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मेगा लिलावाच्या तारखा काढणे शक्‍य नाही. त्यामुळे आयपीएलच्या मेगा लिलावाची प्रतिक्षा आणखी लांबणीवर पडणार आहे.

संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सूपूर्द केली आहे. मेगा लिलावापूर्वी अनेक संघांनी दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मेगा लिलावात त्या खेळांडूना काही संघ पुन्हा आपल्या ताफ्यात घेताना दिसतील. मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्यासह ईशान किशनला बाहेरचा रस्ता दाखवला. यातील हार्दिक पंड्या नव्या संघाकडून खेळताना दिसू शकतो. याचे संकेतही त्याने दिले आहेत.

लखनौची संघबांधणीला सुरुवात

आयपीएलच्या हंगामात पहिल्यांदा मैदानात उतरणाऱ्या लखनौने संघ बांधणीला सुरुवात केली आहे. त्यांनी झिम्बाब्वेचे माजी कसोटीपटू अँडी फ्लावर यांना मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले असून गौतम गंभीरला मेंटार म्हणून निवडले आहे. हा संघ लोकेश राहुलला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. लखनौने लोकेश राहुल आणि राशिद खानसोबत बोलणी सुरु केल्याची चर्चा रंगली होती. यासंदर्भात पंजाब किंग्ज आणि हैदराबादने आक्षेपही नोंदवला होता. त्यामुळे त्यांच्या संघ बांधणीत कोणत्या तीन खेळाडूंना संघात घेणार हे पाहण्याजोगे ठरेल.