#IPL2020 : बेंगळुरूचा रॉयल विजय

दुबई – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा 37 धावांनी पराभव केला. बेंगळुरूच्या 169 धावांचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाने 8 बाद 132 धावांपर्यंतच मजल मारली. कर्णधार विराट कोहली हा सामन्याचा मानकरी ठरला.

अंबाती रायडू (42) आणि एन. जगदीशन (33) वगळता अन्य कोणताही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. कर्णधार महेंद्र सिंह धोनी याही सामन्यात अपयशी ठरला. त्याच्यासह सॅम करन, रवींद्र जडेजा आणि ब्राव्हो यांनी पाठोपाठ झेल देऊन पॅव्हेलियनचा रस्ता धरला होता. 

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने पुन्हा एकदा हाराकिरी केली. कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद 90 धावा व शिवम दुबेच्या नाबाद 22 धावांच्या खेळीच्या जोरावर बेंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात 4 गडी गमावून 169 धावा अशी समाधानकारक धावसंख्या उभारली.

स्पर्धेच्या पहिल्या मोसमापासून बडे खेळाडू असूनही बेंगळुरूला अद्याप एकदाही स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नाही. या सामन्यातही त्यांच्या अपयशाचीच परंपरा कायम राहिली. सलामीवीर ऍरन फिंच 2, एबी डीविलियर्स 0, देवदत्त पडीक्कल 33 व वॉशिंग्टन सुंदर 10 यांनी केवळ हजेरी लावली.

रनमशिन कोहली व नवोदित शिवम दुबे यांचा अपवाद वगळता अन्य एकाही फलंदाजाला जबाबदारीने फलंदाजी करता आली नाही. एकवेळ 4 बाद 93 अशा दयनीय स्थितीतून याच दोन फलंदाजांनी संघाला बाहेर काढले. दरम्यान, कोहलीने 4 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी करत नाबाद 90 धावांची स्वप्नवत खेळी केली. त्याचे शतक मात्र, पूर्ण होऊ शकले नाही.

संक्षिप्त धावफलक :

रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 20 षटकांत 4 बाद 169 धावा. (देवदत्त पडीक्कल 33, विराट कोहली नाबाद 90, शिवम दुबे नाबाद 22, शार्दुल ठाकूर 2-40). चेन्नई सुपर किंग्ज – 20 षटकात 8 जाद 132 धावा. (शेन वॉटसन 14, अंबाती रायडू 42, एन जगदीशन 33, धोनी 10, ख्रिस मॉरिस 3-19, उडाना 1-30, वॉशिंग्टन सुंदर- 2-16, चहल 1-35).

Leave a Comment