#IPL2020 : सांघिक खेळामुळेच विक्रमी विजय – रोहित

दुबई – आयपीएल स्पर्धेचे पाचवे विजेतेपद मिळवल्यानंतर माझे कौतुक होत असले तरीही हा माझ्या एकट्याचा नव्हे तर, सांघिक खेळाचाच विजय आहे, असे मत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे. त्याने संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ तसेच संघमालक यांचे आभार मानले आहेत. 

स्पर्धेतील काही सामन्यांत आम्ही अपयशी ठरलो. मात्र, त्यानंतर खेळाडूंनी आपल्या चुका दूर करत आपल्या खेळात प्रगती केली. त्यांनी एकमेकांना प्रेरणा देत आपला खेळ उंचावला त्यामुळेच हे विजेतेपद साकार झाले. या स्पर्धेत विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवल्यामुळे खेळाडूंचे यश अधोरेखीत झाले आहे. संघात अनुभवी व नवोदित खेळाडूंमध्ये उत्तम समन्वय होता व तेच प्रत्यक्ष मैदानावरही सिद्ध झाले, असेही रोहित म्हणाला.

ट्रेन्ट बोल्ट व जसप्रीत बुमराह हे आमचे ट्रम्पकार्ड ठरले. त्यांनी प्रत्येक सामन्यात अत्यंत जबाबदारीने गोलंदाजी केली. त्यांना साथ देताना आमच्या फलंदाजांनीही मोक्‍याच्या क्षणी कामगिरी उंचावली. स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यासाटी ज्या गोष्टी आवश्‍यक होत्या त्या सर्व जुळून आल्या. या विजयाचे श्रेय सर्वांचे असून हा सांघिक खेळाचाच विजय आहे, असेही रोहित म्हणाला.

सूर्यकुमारसाठी त्याग करायला हवा होता ..

सामन्यात एक धाव घेताना माझा कॉल चुकला, पण तरीही सूर्यकुमारने प्रतिसाद दिला. मात्र, माझ्यासाठी त्याने त्याची विकेट बहाल केली. खरेतर या स्पर्धेत त्याचे सातत्य पाहता मीच त्याच्यासाठी माझी विकेट द्यायला हवी होती, असेही रोहितने सांगितले. धाव घेताना मी धावबाद होणार हे सूर्यकुमारने ओळखले व त्याने मला क्रीझमध्ये येऊ दिले व स्वतः क्रीझच्या बाहेर जात स्वतःलाच धावबाद करण्याची संधी दिल्लीला दिली. त्याच्या या कृतीतूनच त्याची या खेळावरची व सहकारी खेळाडूंबद्दलची निष्ठा दिसूत येते, अशा शब्दात रोहितने सूर्यकुमारचे कौतुक केले.

पॉवर प्लेमध्येच सामना गमावला

स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याची आम्हाला संधी होती. मात्र, आमची गोलंदाजी सुरू असताना मुंबईने पॉवरप्लेमध्ये 61 धावा काढल्या त्यानंतर गोलंदाजांना दिशा व टप्पा राखता आली नाही. तिथेच खरे तर आम्ही सामना गमावला, अशी प्रतिक्रिया दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने व्यक्त केली आहे.

मुंबईचा पहिला बळी लवकर मिळवण्यात यश आले होते, त्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत आमच्या गोलंदाजांवरील दडपण वाढवले. त्यानंतर संघासाठी कोणतीही गोष्ट सकारात्मक घडली नाही. आम्ही फलकावर पुरेशी धावसंख्या उभारली होती. मात्र, कागिसो रबाडाला आलेले अपयश तसेच मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने केलेली फलंदाजी आमच्या पराभवाचे मोठे कारण ठरली. मात्र, तरीही या स्पर्धेतील कामगिरीवर समाधान आहे. यातूनच सर्व खेळाडू बोध घेतील, असेही अय्यर म्हणाला.

सर्वांचे आभार – गांगुली 

ही स्पर्धा बायोबबलमध्ये अमिरातीत खेळवण्यात आली. त्यात सर्व संघांचे खेळाडू, सपोर्ट स्टाफ तसेच स्पर्धेशी संबंधित सर्वांना मी धन्यवाद देतो, अशा शब्दात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पर्धेसाठी सर्वांचेच आभार मानले आहेत.
करोनाच्या धोक्‍यामुळे ही स्पर्धा लांबणीवर पडली. त्यानंतर अमिरातीचा प्रस्ताव स्वीकारून ही स्पर्धा आखातात घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. या सर्व प्रक्रियेत सर्व संघ तसेच मालक व खेळाडूंनी बीसीसीआयच्या या निर्णयाला समर्थन दिले. बायोबबलमध्ये जवळपास दोन महिने राहणे व त्याबाबत एकही तक्रार न करणे हेच या सर्वांचे मोठेपण आहे. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल बीसीसीआय कायम आभारी राहणार आहे, असेही गांगुली म्हणाला.

बक्षिसाबाबत सुखद धक्का 

करोनामुळे सामने व मालिका होत नसल्याने गेल्या सहा महिन्यांपासून बीसीसीआयच्या नफ्यातही घट झालेली होती. त्यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेत दिली जाणाऱ्या बक्षीस रकमेत 50 टक्के कपात करण्याचा निर्णय स्पर्धेच्या सुरुवातीला जाहीर करण्यात आला होता. मात्र, हा निर्णय मागे घेत बीसीसीआयने दरवर्षी प्रमाणेच बक्षीस रक्कम दिली.

विजेत्या मुंबई इंडियन्सला 20 कोटी, उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सचा 12.5 कोटी, सनरायझर्स हैदराबाद व रॉयल चॅलेंजर बेंगळुरूला 8.78 कोटी इतकी रक्कम गेल्या वर्षीप्रमाणेच देण्यात आली. अंतिम सामन्याचा मानकरी ठरलेल्या मुंबईच्या ट्रेन्ट बोल्टला 5 लाख, सर्वाधिक धावा करणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलला ऑरेंज कॅपचे 10 लाख तर, स्पर्धेत सर्वाधिक बळी घेतलेल्या दिल्लीच्या कागिसो रबाडालाही 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

स्पर्धेतील सर्वोत्तम उद्योन्मुख खेळाडू ठरलेला देवदत्त पडीक्कल, व्हॅल्युएबल खेळाडू ठरलेला जोफ्रा आर्चर, सुपर स्ट्राइकर ठरलेला कॅरन पोलार्ड, गेम चेंजर ठरलेला लोकेश राहुल, पॉवर प्लेअर ठरलेला ट्रेन्ट बोल्ट व स्पर्धेत सर्वाधिक षटकार फटकावलेल्या इशान किशन यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. करोनामुळे यंदाच्या बक्षीस रकमेत कपात करण्याचा निर्णय बदलत बीसीसीआयने सर्वांनाच सुखद धक्का दिला.

Leave a Comment