#IPL2021 #SRHvRR : हैदराबादची राजस्थानवर 7 विकेट्‌सनी मात

दुबई – पदार्पणवीर जेसन रॉयचे आक्रमक अर्धशतक आणि केन विल्यमसनच्या संयमी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर 7 विकेट्‌सनी मात दिली. यंदाच्या लीगमधील हैदराबादचा हा दुसरा विजय ठरला. राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 5 बाद 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने 18.3 षटकांत 3 बाद 167 धावा करत विजय मिळविला.

निर्धारित धावांचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरच्या बदली संधी मिळालेला जेसन रॉय आणि वृद्धिमान साहा या सलामीवीरांनी दमदार सलामी देत पाचव्या षटकात अर्धशतकी भागीदारी केली. संजूने पॉवर प्लेचे शेवटचे षटक महिपाल लोमरोरला दिले, महिपालच्या षटकात साहा यष्टिचीत झाला. साहाने 18 धावा केल्या. साहा बाद झाल्यावर केन विल्यमसन मैदानात आला. जेसन रॉयने विल्यमसह अर्धशतकी भागीदारी रचली. 11व्या षटकात रॉयने राहुल तेवतीच्या षटकात चौकार खेचत आपले अर्धशतक पूर्ण केले.

पुढच्याच षटकात चेतन सकारियाने रॉयला बाद केले. रॉयने 42 चेंडूत 8 चौकार आणि एका षटकारासह 80 धावा केल्या. त्यानंतर हैदराबादला अजून एक धक्‍का दिला. वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानने नवा फलंदाज प्रियम गर्गला शून्यावर झेलबाद केले. मुस्तफिझूरने आपल्याच गोलंदाजीवर गर्गचा झेल घेतला. यानंतर विल्यमसनने नाबाद 51 धावांची खेळी करत विजयावर शिक्‍कामोर्तब केला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकत सॅमसनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांना पहिला झटका डावातील दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बसला. सलामीवीर इव्हान लेवीस 6 धावांवर परतला. त्यानंतर मात्र सॅमसनने यशस्वी जयस्वालच्या साथीत संघाचा डाव सावरताना दुसऱ्या गड्यासाठी 56 धावांची भागीदारी केली. जयस्वालही स्थिरावल्यावर अनावश्‍यक फटका मारून बाद झाला.

त्याने 23 चेंडूत 5 चौकार व 1 षटकार फटकावताना 36 धावांची खेळी केली. त्यानंतर महिपाल लोमरोरने सॅमसनला सुरेख साथ देत संघाला दीडशतकी धावांच्या पुढे मजल मारून दिली. दरम्यान, सॅमसनने आपले अर्धशतक पूर्ण केले. सॅमसनही धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात 82 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 57 चेंडूत 7 चौकार व 3 षटकार अशी आतषबाजी केली. हैदराबादकडून सिद्धार्थ कौलने 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक :

राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 5 बाद 164 धावा. (संजू सॅमसन 82, यशस्वी जयस्वाल 36, महिपाल लोमरोर 29, सिद्धार्थ कौल 2-36).
सनरायझर्स हैदराबाद – 18.3 षटकांत 3 बाद 167 धावा. (जेसन रॉय 60, वृद्धिमान साहा 18, केन विल्यमसन नाबाद 51, अभिषेक शर्मा नाबाद 21,.चेतन सकारिया 1-32).