Israel and Hamas War : भारताची कौतुकास्पद कामगिरी; पॅलेस्टाईनला केली मदत

इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात मागील काही दिवसांपासून युद्ध सुरू आहेत. यात अनेक लोकांना आपला जीव गमावावा लागला. या युद्धादरम्यान जगातील अनेक देशांनी गाझामधील लोकांसाठी मदत करण्याचे आवाहन केले. जेणेकरून तेथील लोकांना मदत पोहचली जाईल. त्याअनुषंगाने आता भारताने देखील एक पाऊल पुढे येत पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी मदत केली आहे.

भारताने पॅलेस्टाईनमधील लोकांना मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत पाठवली आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.  हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलकडून गाझा पट्टी सील करण्यात आली होती. या भागात इंधन, पाणी आणि इतर काही साहित्यांचीही नाकाबंदी करण्यात आली होती. मात्र आता ही इजिप्त आणि गाझा पट्टी दरम्यानची सीमा इस्रायलने खुली केली.

गाझा आणि इजिप्तमधील राफा सीमा ओलांडून ही मदत सामग्री पोहोचवली जाईल. इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ला केल्यापासून तेथील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. तिथे लोकांना अन्न, पाणी, औषध आणि जीवनावश्यक गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत आहे. मदत सामग्रीचा पहिला ट्रक गेल्या शनिवारी गाझा येथे पोहोचला, त्यानंतर आतापर्यंत सुमारे २० ट्रक तेथे पोहोचले आहेत. ज्यात औषधं, वैद्यकीय पुरवठा आणि मर्यादित प्रमाणात अन्न आणल्याचं त्यांनी म्हटलं.

भारतीय हवाई दलाचे C-17 ग्लोबमास्टर विमान इजिप्तच्या अल-अरिश आंतरराष्ट्रीय विमानतळावर मदत सामग्री घेऊन रवाना झाले आहे. भारतानं या विमानाद्वारे पॅलेस्टाईनमधील लोकांना सुमारे 6.5 टन वैद्यकीय मदत आणि 32 टन आपत्ती निवारण साहित्य पाठवले आहे. जीवन रक्षक औषधं, सर्जिकल वस्तू, तंबू, स्लिपिंग बॅग, ताडपत्री, स्वच्छता सेवा, पाणी शुद्ध करणारी औषधं यासह अनेक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत. गाझामध्ये 23 लाख पॅलेस्टिनी रहिवासी आहेत. त्यांच्यापैकी काही लोकांनी दक्षिणेकडे स्थलांतर केले आहे.