गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; 30 पॅलेस्टिनी ठार

देर-अल-बलाह, (गाझा पट्टा)  – मध्य गाझामधील एका शाळेत सुरू करण्यात आलेल्या शरणार्थ्यांच्या छावणीवर आज पहाटे इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये ३० जण ठार झाले. या शाळेचा वापर हमासच्या दहशतवाद्यांकडून लपण्यासाठी केला जात होता, असे इस्रायलच्या सैन्याने सांगितल. (Israel strike on UN school)

या शाळेवरील हल्ल्यात मरण पावलेल्यांचे किमान ३० मृतदेह आणि घरावर वेगळ्या ठिकाणी झालेल्या माऱ्यांतील आणखी सहा मृतदेह देर अल-बालाह येथील अल-अक्सा शहीद रुग्णालयाला मिळाले, असे रुग्णालयाने सांगितले.

इस्रायलच्या लढाऊ विमानांनी पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीने चालवल्या जाणाऱ्या शाळेवर हल्ला केला, असे इस्रायली सैन्याने सांगितले. हमास आणि इस्लामिक जिहादने त्यांच्या ऑपरेशनसाठी या शाळेचा वापर केला, असा दावा इस्रायली सैन्याने ताबडतोब कोणतेही पुरावे न देता केला.

हवाई हल्ला करण्यापुर्वी जीवितहानी मर्यादित होण्यासाठी काही उपाययोजना देखील केल्या गेल्या होत्या. हवाई पाळत ठेवली गेली होती आणि अतिरिक्त गुप्तचर माहिती घेतली गेली होती, असे इस्त्रायली सैन्याने सांगितले.

दोन्ही हवाई हल्ले गाझा मधील अनेक निर्वासित शिबिरांपैकी एक नुसेरात येथे झाले. १९४८ मध्ये इस्रायलच्या निर्मितीभोवती युद्ध सुरू झाले होते. तेंव्हा हजारो पॅलेस्टिनींचे पलायन झाले किंवा नवीन राज्य बनल्यावर त्यांना त्यांच्या घरातून हाकलण्यात आले होते. तेंव्हाच्या शरणार्थ्यांसाठी नुसरत भागात विस्थापितांची छावणी उभी केली गेली होती.

इस्रायलचे सैन्य देर अल-बालाहच्या पूर्व भागात आणि मध्य गाझामधील बुरेज निर्वासित छावणीमध्ये जमिनीच्या वर आणि खाली दोन्ही ठिकाणी कार्यरत आहेत. या कारवाईची सुरुवात अतिरेक्यांच्या पायाभूत सुविधांवर हवाई हल्ल्याने झाली, त्यानंतर सैन्याने दोन्ही भागात ऑपरेशन सुरू केल, असे लष्कराने बुधवारी सांगितले.

युद्ध सुरू झाल्यापासून गाझा मधधील संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीकडून चालवल्या जाणाऱ्या शाळा शरणार्थ्यांच्या छावण्या म्हणून वापरल्या जात आहेत. या भागात २.३ दशलक्ष पॅलेस्टिनी लोकसंख्येच्या प्रदेशातील बहुतेक लोक विस्थापित झाले आहेत.