‘केवळ विरोधक म्हणून टीका…’भुजबळांकडून आव्हाड यांची पाठराखण

Jitendra Awhad  । मनुस्मृती दहन करण्याकरिता महाड येथे पोहोचलेले शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच अडचणीत सापडले आहेत. मनुस्मृती लिहिलेले पुस्तक फाडत असताना, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. त्यामुळे त्यांच्यावर राज्यभरातून टिकेची झोड उठली. या प्रकरणी राज्यभरातील महायुतीतील नेत्यांनी आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी देखील सर्वांची माफी मागितली आहे.

 

या संदर्भात आव्हाड म्हणाले की, मनुस्मृतीचे दहन करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर अनावधानाने फाडले गेले आहे. या मागे आमचा कोणताही दुसरा हेतू नव्हता. मात्र, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, पण आम्ही हे मुद्दाम केलेले नाही. या संदर्भात विरोधकांना राजकारण करायचे असल्याने ते अनेक मागण्या करतील. मात्र, मी त्यावर काहीही बोलणार नाही. कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर माफी मागतो, असे स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या घटनेवर दिले आहे.

राज्यभरातील महायुतीतील नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली असली तरी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे. माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’ मनुस्मृती जाळताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोही फडण्यात आला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली आहे.त्यामुळे केवळ विरोधक म्हणून आव्हाड यांच्यावर टीका नको.’ अशी भूमिका भुजबळ यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे आता शिंदे गटातील नेते तसेच भाजप नेते नेमकी काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.