के कवितांना अंतरिम जामीन नाकारला..

नवी दिल्ली – दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टाने सोमवारी भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएस पक्षाच्या नेत्या आमदार के. कविता यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. आपल्या अल्पवयीन मुलाची शालेय परीक्षा असल्याच्या कारणावरून त्यांनी अंतरिम जामीन मागितला होता. दिल्ली सरकारच्या मद्य घोटाळा प्रकरणात त्या ईडीच्या कोठडीत आहेत.

बीआरएस नेत्याच्या जामीन अर्जाला ईडीच्या वकिलाने विरोध केला. त्यांनी युक्तिवाद केला की कविता यांनी त्यांच्या फोनमधील पुरावे नष्ट केले आणि साक्षीदारांना त्यांचे म्हणणे मागे घेण्यास भाग पाडले.

कविता यांच्यावतीने ज्येष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी त्यांची बाजू मांडली. एक महिला म्हणून त्यांच्या बाबतीत कठोरता अवलंबता येणार नाही. मनि लॉंड्रिंग कायद्याच्या कलम ४५ नुसार न्यायालयाला अपवादाच्या श्रेणीत महिलांचा विचार करता येतो असे त्यांनी नमूद केले.

कविता यांनी पासपोर्ट जमा केला असल्याने त्या विदेशात जाण्याचा कोणताही धोका नाही असे त्यांनी नमूद केले होते, पण कोर्टाने त्यांचे म्हणणे अमान्य केले.