Kabaddi | कबड्डी निवड चाचणी आता बारामतीत

पुणे – महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या जिल्हानिहाय नियोजनावर टीका झाल्याने स्पर्धांसह निवड चाचणीबाबतही अनेकदा प्रश्‍न विचारले जात आहेत. त्यातच अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे 13 ते 16 एप्रिल या कालावधीत होणाऱ्या पुरुषांच्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची मैदानी निवड चाचणी प्रक्रिया 17 आणि 18 मार्चला बारामती क्रीडा अकादमीत होणार आहे.

करोनाचा धोका वाढत असल्यामुळे राज्य संघटनेने मैदानी निवड प्रक्रिया कर्नाळा येथून बारामतीला हलवली आहे. मागील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंसह प्रत्येक जिल्ह्याच्या चार खेळाडूंची नावे पाठवण्याचे आवाहन केले आहे.

पण निवड प्रक्रियेचे नियोजन करताना 17 मार्चला मराठवाड्याचे आठ जिल्हे (औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड), खान्देशचे चार जिल्हे (नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार) आणि सोलापूर अशा 13 संघांना आमंत्रित केले. तसेच 18 मार्चला पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच जिल्हे (पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर, कोल्हापूर) आणि कोकणपट्ट्यातील सात जिल्हे (मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) अशा 12 जिल्ह्यांना स्थान दिले आहे.

त्यामुळे पहिल्या दिवशी कबड्डीतील पिछाडीवरील जिल्हे व दुसऱ्या दिवशी आघाडीचे जिल्हे अशी विभागणी झाल्याचे स्पष्ट होते. परंतु आघाडीच्या जिल्ह्यांतून पिछाडीच्या जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित झालेल्या काही खेळाडूंचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी ही रचना केल्याचे कबड्डीक्षेत्रात म्हटले जात आहे.

Leave a Comment