लक्षवेधी- कलादान प्रकल्प : सशक्‍त सागरी मार्गाचा उदय

मंदार चौधरी

भारत-म्यानमार संबंधांना गेल्या काही वर्षांत एक नवीन वळण मिळाले आहे. जितका परराष्ट्र संबंधात एकमेकांच्या आर्थिक सक्षमतेवर परस्पर राष्ट्रांचा जोर जास्त तितके त्यांचे व्यावहारिक नातेसंबंध वृद्धिंगत व्हायला मदत होते. आंतरराष्ट्रीय परराष्ट्र संबंधात व्यक्‍तिगत किंवा प्रेमाच्या संबंधांना स्थान नसते. जे काही संबंधांना परिमाण लाभते त्यात आर्थिक निकष आणि सारासार सामरिक दृष्टीचे वेगळे महत्त्व असते. अशाच एका दूरदृष्टीच्या भूमिकेतून भारत-म्यानमारच्या सहकार्यातून कलादान प्रकल्प विकसित होतोय. कलादान प्रकल्प वाहतूक प्रकल्प असून भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील एक अति महत्त्वाचे बंदर कोलकाता ते म्यानमारमधील राखाईनच्या अंतर्गत येणारे सित्तवे बंदर यांना जोडणारा वाहतूक प्रकल्प म्हणून महत्त्वाचा आहे.

भारत आणि म्यानमारच्या सेनेने एक महत्त्वपूर्ण मोहीम फत्ते केली. कोलकातापासूनच सित्तवे बंदरापर्यंत समुद्री मार्ग बनवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. कोणताही प्रकल्प प्रत्यक्षात आणताना त्याच्या वर्तमान आणि भविष्यातल्या समस्या आणि फायद्यांवर नैतिकतेने चिंतन करणे हे एक सुज्ञपणाचे लक्षण आहे. हा समुद्री मार्ग जवळपास 225 किमी लांबीचा असेल. मिझोराम आणि मणिपूर सारख्या राज्यांना हा एक छोटा रस्ता असेल जो की सरळ सित्तवेपासून भारताच्या उत्तर-पूर्व भागात प्रवेश करतो. या कलादान प्रकल्पावर थोडा धोका येत होता. हा धोका समुद्रातल्या चाच्यांचा किंवा घुसखोरांचा होता. यांना मुख्य उदरनिर्वाहाचं साधन वगैरे असं काही नाही. त्यामुळे काही कुठे कोणता मोठा प्रकल्प वगैरे सुरू असला की तिथे जाऊन तिथल्या संबंधितांना धमकावून पैसे उकळणे हे यांचे मुख्य काम आहे. अशाच प्रकारचा प्रयत्न यांचा या प्रकल्पात ढवळाढवळ करायचा होता; पण भारत आणि म्यानमारच्या सैन्याचे संयुक्तरित्या यांचा विरोध यशस्वीपणे मोडून काढल्याबद्दल अभिनंदन केले पाहिजे.

भारताच्या पूर्वोत्तर भागात जर आपल्या कोलकाताहून जायचं म्हटलं तर बऱ्यापैकी लांब अंतर आपल्याला पार करावं लागतं. कोलकातावरून भूटान, सिक्कीम असा प्रवास करून रस्ता आसामपर्यंत पोचतो. हा भाग संवेदनशील आहे. आपल्याला हे माहीतच आहे की, भारताची पूर्वउत्तर सीमा सदैव धोक्‍यात असते. चीनसारख्या बलाढ्य शक्तीचा दबाव या प्रांतावर आहेच. डोकलामची समस्या आली होती, त्या काळात चीन आसाम-अरुणाचल प्रदेश पर्यंत येऊन गेला होता. असे अंदाज पण लावण्यात येत होते की, चीनचे इरादे हा प्रदेश बळकावण्याचे आहेत. या भागात ब्रह्मपुत्रा आणि तिस्ता या बलाढ्य नद्या आहेत. ज्यांच्या पात्राचा घेराव मैदानी प्रदेशात विस्तीर्ण आहे. पावसाळ्यात मोठी पूरपरिस्थिती आल्यावर हा रस्ता बंद व्हायची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे या जुन्या जमिनीवरच्या रस्त्याला पर्याय म्हणून हा कलादान प्रकल्प दोन्ही देशांसाठी वरदान ठरू शकतो.

तसं बघायला गेलं तर कोलकातावरून आपण पारंपरिक मार्गाने गेले तर सित्तवेपर्यंतचे अंतर 2700 किमी आहे. परत हा रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित नाही आणि ओबडधोबड आहे. पण समुद्रीमार्गाने हेच अंतर फक्‍त 550 किमी आहे. सित्तवे बंदर एक मोठे बंदर आहे. जवळपास वीस हजार टनापर्यंत त्याची मालवाहतुकीची क्षमता आहे. या बंदरापासून 175 किमीवर कलादान नावाची नदी आहे. म्यानमारमध्ये अंतर्गत वाहतुकीसाठी नद्यांचा फार मोठ्या प्रमाणात वापर होतो. रस्त्यांचा वापर फार कमी प्रमाणात होतो. या बंदरातून कलादान नदीपर्यंत जाता येते आणि कलादान नदीच्या पात्रापासून मिझोरमची सीमा 80 ते 90 किमी आहे. त्यामुळे एक थेट संबंध प्रस्थापित होतो यात काही वाद नाही. मिझोरम राज्यात झोरिनप्यु नावाची जागा आहे. तिथपर्यंत मग सडक मार्गाने हा रस्ता जातो. यामुळे आपण पूर्वोत्तर राज्यांच्या केंद्रभागी येतो. तिथून संपूर्ण पूर्वोत्तर भागात कुठेही वेळ न दवडता आपण जाऊ शकतो. मणिपूरपासून सरकारने एक नवीन सडक परियोजना बनवली आहे. ज्याला आपण “पूर्व-पश्‍चिम कॉरिडॉर’ म्हणतो. तिथून म्यानमारमध्ये प्रवेश या रस्त्याने होतो. सरकारचा विचार हा रस्ता म्यानमारच्याही पुढे थायलंड व व्हिएतनामपर्यंत नेण्याचा आहे. त्यामुळे हा रस्ता सुरू झाला तर संपूर्ण पूर्वोत्तरचा भाग आंतरराष्ट्रीय व्यापार सहजतेने करू शकतो. सडकच्या माध्यमातूनसुद्धा आणि समुद्रमार्गेसुद्धा.

या प्रकल्पाचे जसे आर्थिक फायदे आहेत तसेच काही लष्करी फायदेसुद्धा आहेत. लष्कराच्या धोरणाचा एक भाग असा असतो की लष्कर नेहमी आपण ज्याला दैनंदिन भाषेत “प्लॅन बी’ म्हणतो तो तयार ठेवते. काही कारणास्तव जर एक मार्ग बंद झाला तर दुसरा रस्ता तयार असायला पाहिजे म्हणून सरकारने या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलले आहे. या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, भारताचा पूर्वोत्तर भाग जो की बाकी प्रदेशांपासून तुलनेने खूप दूर आहे त्याला जवळचे बंदर म्हटल्यावर कोलकाता हेच आहे. इतक्‍या दूर येण्यापेक्षा मिझोरम पार करून सित्तवे बंदरापर्यंत आल्यावर संपूर्ण जगाचा व्यापार पूर्वोत्तर भारताला खुला होईल. या भागात चहाचे मळे प्रचंड आहेत. सध्या हा सगळा व्यापार कोलकाता बंदरातून होतो. त्यामुळे सगळ्या पूर्वोत्तर भारताला भौगोलिकदृष्ट्‌या इतक्‍या दूरच्या प्रदेशावर अवलंबून असावं लागतं. भारत आणि म्यानमारच्या सैन्याने आराकान आणि कचीन आर्मीला लगाम बसवून उत्कृष्ट कार्याचा परिचय दिला आहे.त्यांनी मिझोरम आणि म्यानमारच्या सीमांमध्ये जे बेकायदेशीर अड्डे प्रस्थापित केले होते, संयुक्‍त सैन्याने त्यांना पुरेपूर मोडीत काढले आहे.

म्यानमारने त्यांची भारतासोबतच सीमा या अराजकतेचा धोका टाळण्यासाठी बऱ्यापैकी बंद केली आहे. पण जर याचा उलटा परिणाम होऊन या बंडखोरांच्या टोळ्या भारताच्या सीमेत घुसण्याच्या प्रयत्नात असल्या तर त्यामुळे भारतीय सैन्य अशा अनेक घुसखोरीला आळा घालण्यासाठी सशस्त्र पहारा देत आहेत. इंडो-म्यानमार सीमा एकदम खुली आहे. वातावरण एकदम सौहार्दपूर्ण आहे. म्यानमारचे लोक भारतात आणि भारताचे लोक म्यानमारमध्ये एका ठराविक सीमेपर्यंत जाऊ शकतात. इतका खुला व्यवहार दोन्ही देशांत आहे. अशा परिस्थितीत कलादान प्रकल्प दोन्ही देशांसाठी नक्कीच वरदान ठरेल यात शंकाच नाही.

Leave a Comment