कमलनाथ यांच्या प्रवेशाने भाजपला कसा होणार फायदा ? ; समजून घ्या निवडणुकीतील आकड्यांचा खेळ

kamal nath-bjp। देशात लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. सर्व पक्षाने यासाठी जोरदार तयारीदेखील केलीय. मात्र या निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेश काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जातीय. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ लवकरच त्यांचा मुलगा नकुल नाथ यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.

गेल्या शनिवारपासून कमलनाथ आपल्या मुलासह दिल्लीत तळ ठोकून आहेत.  ते आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी शक्यता वर्तवली जातीय. दुसरीकडे, या सर्व चर्चांच्या दरम्यान काँग्रेस हायकमांड सतर्क झालं आहे. काँग्रेस आपल्या आमदारांना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतीय. प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते काँग्रेस आमदारांच्या संपर्कात आहेत. आमदारांशी वन टू वन संपर्क केला जात आहे. कमलनाथ समर्थकांच्या मते सात आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.

अशा परिस्थितीत ७७ वर्षीय कमलनाथ ४४ वर्षांनंतर काँग्रेस सोडण्याचा विचार का करत आहेत, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. कमलनाथ भाजपमध्ये दाखल झाले तर राज्याच्या राजकारणात काय फरक पडणार? कमलनाथ यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक आमदार आणि अनेक बडे नेतेही पक्षात जातील. असे झाल्यास काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल. उलट याचा थेट फायदा आगामी लोकसभेच्या तयारीत असलेल्या भाजपला सहज होणार.

कमलनाथ यांचा भाजपला कसा फायदा होईल? kamal nath-bjp।

छिंदवाड्याचे क्षत्रप म्हटल्या जाणाऱ्या कमलनाथ यांचे संपूर्ण मध्य प्रदेशवर वर्चस्व अजूनही कायम आहे. कमलनाथ जर भाजपमध्ये आले तर  भाजपचा ‘अब कि बार ४०० पार’चा आकडा साध्य करणं सोपे होणारेय.जर कमलनाथ भाजपमध्ये आले तर मध्य प्रदेशातील लोकसभेच्या 29 पैकी 80 टक्के जागा सहज भाजपच्या वाट्याला जाऊ शकतात, कारण विरोधकांकडे भाजपाला विरोध करण्यासाठी इतका मोठा चेहरा उरणार नाही. ज्याच्या जोरावर ते मध्य प्रदेशातील भाजपची मते कमी करू शकतील.

सध्या मध्य प्रदेशातील लोकसभेच्या २९ पैकी २८ जागांवर भाजपचे खासदार आहेत. फक्त छिंदवाडा याच ठिकाणी भाजप जिंकू शकलेला नाही. छिंदवाडामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील सर्व 7 जागांवर भाजपचा दारुण पराभव झाला होता. कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली इथं जिंकणं सोपं नाही हे भाजपलाही चांगलेच ठाऊक आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ १९८० वर्षांपासून मध्य प्रदेशच्या राजकारणात सक्रिय आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या समर्थकांची संख्याही सातत्याने वाढत आहे. अशा स्थितीत आगामी लोकसभेत क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने रिंगणात उतरलेला भाजप त्याचे अधिक चांगल्या पद्धतीने भांडवल असे म्हटले जात आहे. इतकेच नाही तर कमलनाथ यांच्या भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाचे मिशन 2029 देखील सोपे होणार आहे. पक्ष कमलनाथ यांनाही निवडणुकीत उतरवू शकतो. याशिवाय त्यांना केंद्रात मंत्रीपददेखील मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे होणार  मोठे नुकसान kamal nath-bjp।

देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस गेल्या दशकापासून देशात सत्तेबाहेर आहे. एवढेच नाही तर हा पक्ष सध्या केवळ दोन राज्यांपुरता मर्यादित आहे. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या इतक्या जवळच मोठा निवडणूक निधी जमा करणारे नेते कमलनाथ यांनी पक्ष सोडल्यास काँग्रेस पक्षाचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

मध्य प्रदेशात काँग्रेसचे चार मोठे चेहरे होते. त्यापैकी एक दिवंगत अर्जुन सिंग होते, पण आता त्यांचा वारसा जवळपास कमकुवत झाला आहे. दुसरे नेते दिग्विजय सिंह आहेत, त्यांनीही आपल्या सततच्या वक्तव्याने आपली प्रतिमा मालिन करून घेतलीय. तिसरे नेते ज्योतिरादित्य सिंधिया होते, ते आधीच भाजपवासी झाले अन् 2020 मध्ये काँग्रेसचे सरकार पाडले. आता कमलनाथ यांनीही काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला तर काँग्रेसला राज्यात कोणताही मोठा प्रादेशिक नेता उरणार नाही.

एकापाठोपाठ एक मोठे नेते गेल्याने काँग्रेस पक्ष आता नेतृत्वहीन होताना दिसत आहे. काही दिवसांतच देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी राहुल गांधी पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी एकापाठोपाठ एक दौरे करत असताना त्यांचे नेते मात्र सतत पक्ष सोडत आहेत. पक्षाची सद्यस्थिती अशी आहे की, मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांनाही काँग्रेस सांभाळू शकत नाही. अशा स्थितीत कमलनाथ यांनी काँग्रेसला अलविदा केल्यास जनतेचा काँग्रेसवरील विश्वास डळमळीत होईल.

कमलनाथ काँग्रेसवर का नाराज 

प्राप्त माहितीनुसार, काँग्रेसवर नाराज होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुका. ही निवडणूक कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. निवडणुकीच्या निकालात 230 जागांपैकी भाजपने 163 तर काँग्रेसने 66 जागा जिंकल्या. त्यात काँग्रेसने या पराभवाचा संपूर्ण ठपका कमलनाथ यांच्यावर टाकला.

एवढेच नाही तर काँग्रेसने अचानकपणे जितू पटवारी यांच्याकडे प्रदेशाध्यक्षाची लगाम सोपवली. जितू पटवारी हे राहुल गांधी यांच्या जवळचे होते. यानंतर कमलनाथ राज्यसभेची निवडणूक लढवून केंद्रीय राजकारणाचा भाग बनू शकतात, असे बोलले जात होते, मात्र काँग्रेसने दिग्विजय सिंह यांचे समर्थक अशोक सिंह यांना राज्यसभेचे उमेदवार म्हणून मैदानात उतरवलं त्यामुळे कमलनाथ नाराज होते.