आ. कर्डिलेंवरील टीकेबाबत डॉ. विखेंचा माफीनामा

 बुऱ्हाणनगरमध्ये कर्डिले समर्थकांशी चर्चा; टीका झाल्यास व्यासपीठावर थांबणार नाही

नगर: आ. शिवाजीराव कर्डिले हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्या शिवसेना नेत्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. यापुढे असे होणार नाही. नगर तालुक्‍यात यापुढे कोणालाही गाडीत बसवणार नाही. भाषणही करू देणार नाही. जर यापुढे पुन्हा आ.कर्डिले यांच्यावर कोणी टीका केली तर मी व्यासपीठावर थांबणार नाही, अशा शब्दात भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी सकाळी बुऱ्हाणनगर येथे जावून कर्डिले समर्थकांपुढे झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्‍त केली.

शिवसेनेच्या नगर शहर व तालुक्‍यातील नेत्यांकडून डॉ. विखे यांच्या उपस्थितीतच आ.कर्डिले यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका होत असल्याने संतापलेल्या कर्डिले समर्थकांनी रविवारी पत्रकार परिषद घेवून शिवसेनेने आ.कर्डिलेंवर टिका करायचे न थांबविल्यास वेगळा विचार करावा लागेल, असा गंभीर इशारा दिला होता. याबाबत त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष तसेच प्रदेश कार्यालयाकडेही निवेदन पाठविले होते. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. त्यामुळे डॉ. विखे यांनी सोमवारी सकाळी बुऱ्हाणनगर गाठले. आ.कर्डिले यांच्या निवासस्थानी जावून तेथे जमलेल्या कर्डिले समर्थकांशी चर्चा केली. यावेळी कर्डिले समर्थकांनी झाल्या प्रकाराबाबत डॉ. विखे यांच्या समोर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना जाब विचारला. त्यांच्यावर तुमच्या उपस्थितीत टीका होत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही.

गेल्या 15 वर्षात 2 विधानसभा, 1 विधानपरिषद निवडणुकीत सपाटून पराभव झालेले प्रा. शशिकांत गाडे यांची 5 वेळा आमदार झालेले आ.कर्डिले यांच्यावर टीका करण्याची लायकी तरी आहे का? त्यांच्यासह अनिल राठोड यांचा ही पराभव झाल्यापासून ते वैफल्य ग्रस्त झालेले असून ते पराभवाच्या धक्‍क्‍यातून बाहेर पडलेले नाहीत. त्यामुळेच ते जनता पाठीशी असलेल्या लोकनेत्यावर चिखलफेक करत आहेत. आ. कर्डिले ज्येष्ठ नेते असल्याने ते याकडे दुर्लक्ष करत असले तरी आम्ही मात्र हे सहन करणार नाही. मागील जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी तुम्ही कॉंग्रेसमध्ये होते. त्यावेळी तुम्ही आमच्या विरोधात महाआघाडीला मदत केली तरीही आम्ही झालं गेलं विसरून तुमच्या प्रचारात सक्रीय आहोत. ते केवळ आ. कर्डिले यांनी दिलेल्या आदेशानुसारच, या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार कोण? आणि शिवसेनावाले टीका करताय कोणावर ? याचे त्यांना भान आहे का? त्यांना जर लय खुमखुमी असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या समोरासमोर असे आव्हानही यावेळी कर्डिले समर्थकांनी दिले. यापुढील काळात आमच्या नेत्यावर जर टीका झाली तर ती आम्ही सहन करणार नाही. वेळ पडल्यास या निवडणुकीत राजकीय सर्जिकल स्ट्राईक करून दाखवू असा इशाराही यावेळी कर्डिले समर्थकांनी दिला.

यावेळी डॉ. विखे म्हणाले, आ. कर्डिलेंवर झालेल्या टीकेबाबत जाहीर दिलगिरी व्यक्‍त करतो, यापुढे असे घडणार नाही, अशी हमी कर्डिले समर्थकांना दिली. यापुढे नगर तालुक्‍यात होणाऱ्या सभा, मेळाव्यांमध्ये कोणालाही भाषण करू देणार नाही. मी एकटाच भाषण करील. कोणीही यापुढे व्यक्तिगत टीका टिपण्णी करू नये, ही लोकसभा निवडणूक आहे. स्थानिक नाही. हा संघर्ष वेगळे वळण घेत आहे. त्यामुळे तो थांबला पाहिजे. अशी आपली भूमिका असून शिवसेना नेत्यांनाही तशा सूचना दिल्या असल्याचे डॉ. विखे यांनी सांगितले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, पंचायत समितीचे गटनेते रवींद्र कडूस, उद्धव अमृते, अनिल करांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, संचालक संदीप कर्डिले, हरिभाऊ कर्डिले, रेवणनाथ चोभे, बाबासाहेब खर्से, बन्सी कराळे, बाळासाहेब निमसे, संतोष म्हस्के, रोहिदास मगर, जालिंदर कदम, कैलास पठारे, राहुल पानसरे, भाऊसाहेब काळे, शरद बोठे, श्रीकांत जगदाळे, दत्ता सप्रे, कानिफनाथ कासार, प्रभाकर भांबरे आदींसह कर्डिले समर्थक यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment