कर्नाटकाला आता लॉकडाऊनची गरज नाही – येडियुरप्पा

बंगळुरू: कर्नाटकात कोविडची स्थिती आटोक्‍यात असून या राज्याला आता लॉकडाऊनची गरज नाही, त्यामुळे कर्नाटकाला आता या निर्बंधांतून मुक्‍तता द्यावी, अशी विनंती आपण पंतप्रधान मोदी यांच्याकडे करणार आहोत, अशी माहिती या राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिली आहे.

मोदींशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे होणाऱ्या चर्चेत आपण ही विनंती करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आता करोनासाठी घालण्यात आलेले निर्बंध उठवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

अजूनही या निर्बंधांनुसार मेट्रो, थिएटर्स, जिम, स्वीमिंग पुल, बार अशा सुविधा बंद आहेत. पंतप्रधान मोदी मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी करोनाविषयक स्थितीसंबंधात चर्चा करणार आहेत. त्यानुसार येत्या बुधवारी येडियुरप्पा हे पंतप्रधानांशी संवाद साधतील.

Leave a Comment