Karnataka : घोषणापत्रातील ‘त्या’ सर्व पाच निवडणूक हमींची अंमलबजावणी करणार – मुख्यमंत्री सिध्दरामय्या

बंगळुरू – कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने जे घोषणापत्र जारी केले होते, त्यात पाच निवडणूक हमी दिल्या होत्या. सरकार आल्यावर त्यांची पूर्तता केली जाणार अशी ही हमी होती. आज राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अगोदर घेण्यात आलेल्या बैठकीत या पाचही हमी पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी दिली आहे.

कॅबिनेटच्या अगोदर घेण्यात आलेल्या प्रि कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कर्नाटकचे सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित होते. या हमींची पूर्तता करण्यास आम्ही कटीबध्द आहोत. त्याचे सादरीकरण आज करण्यात आले अशी माहिती उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही दिली.

कॉंग्रेसने दिलेल्या 5 हमी:

1. गृह ज्योती- या अंतर्गत प्रत्येक घराला 200 युनिट वीज मोफत देणार
2. गृह लक्ष्मी- प्रत्येक महिला कुटुंब प्रमुखाला दरमहा 2 हजार रूपयांची मदत करणार
3. अन्न भाग्य- या योजनेंतर्गत दारिद्रयरेषेखालील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दरमहा दहा किलो तांदुळ मोफत देणार
4. युवा निधी- 18 ते 25 वयोगटातील पदवीधर बेरोजगार तरूणाला दोन वर्ष दरमहा तीन हजार रूपये आणि पदविका धारकाला दरमहा 1500 रूपयांची मदत
5. शक्ती- यो हमी अंतर्गत महिलांना सार्वजनिक बस सेवेत मोफत प्रवासाची सुविधा देणार
या पाच हमींवर शुक्रवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाणार आहे.