कर्नाटक : येडियुरप्पा यांनी दिले पायउतार होण्याचे संकेत

बंगळूर – भाजपची सत्ता असणाऱ्या कर्नाटकमध्ये बऱ्याच दिवसांपासून नेतृत्वबदलाची चर्चा आहे. आता खुद्द मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी पदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत.

भाजपमध्येच येडियुरप्पा हटाव मोहीम सुरू असल्याचे चित्र आहे. अशात त्यांनी नुकताच दिल्ली दौरा करून पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या भवितव्याविषयीच्या चर्चांना आणखीच उधाण आले. त्यापार्श्‍वभूमीवर, विविध समुदायांच्या संत-महंतांनी मंगळवारी येडियुरप्पा यांची भेट घेऊन त्यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शवला.

संत-महंतांनी त्या भेटीत येडियुरप्पा यांना नेमके काय घडत आहे, असा प्रश्‍न विचारला. मात्र, त्यावर काही बोलण्यास येडियुरप्पा यांनी नकार दर्शवला. पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असेल, एवढेच ते म्हणाले.

त्यामुळे येडियुरप्पा यांनी पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास मुख्यमंत्रिपद सोडण्याविषयी मनाची तयारी ठेवल्याचे सूचित होत आहे. दरम्यान, येडियुरप्पा यांना हटवले जाऊ नये, अशी भूमिका संत-महतांनी घेतली.

येडियुरप्पा यांना हटवल्यास भाजपला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे येडियुरप्पा यांच्याबाबत निर्णय घेताना भाजपचीच कोंडी होण्याची चिन्हे आहेत.