पुणे जिल्हा | माळेगाव खुर्दच्या सरपंचपदी काटे देशमुख

माळेगाव, (वार्ताहर)- राजकारणात दिलेल्या शब्दाला जागणारी म्हणून संपूर्ण तालुक्यात ओळख असलेल्या ग्रामपंचायत माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथील सरपंच पल्लवी काटे यांनी ठरल्याप्रमाणे सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त जागेवर सदस्य आदित्य काटे देशमुख यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड केल्याचे निवडणूक अधिकारी तथा मंडळाधिकारी विनोद धापटे यांनी जाहीर केले. याकामी तलाठी अमोल मारग व ग्रामसेवक आय.आर.इनामदार यांनी मदत केली.

यावेळी मावळत्या सरपंच पल्लवी काटे, उपसरपंच विशाल देवकाते, सदस्य सुनील शिर्के, मंगेश काटे, सदस्या पोर्णिमा पवार, माजी उपसरपंच निशिगंधा जाधव, राजश्री आडके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, कारखान्याचे संचालक संजय काटे, उद्योजक शिवराज जाधवराव, संभाजी काटे, बापुराव शिर्के, ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, नवनिर्वाचित सरपंच आदित्य काटे देशमुख यांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समिती, माळेगांव कारखाना, विविध संघटना व पत्रकार संघटनेने केला. सर्व सदस्य व ग्रामस्थांना सोबत घेऊन गावाचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील, असे नवनिर्वाचित सरपंच आदित्य काटे यांनी सांगितले.

काटे कुटुंबाला राजकीय वारसा
दरम्यान, नवनिर्वाचित सरपंच आदित्य काटे देशमुख यांचे आजोबा कै. शिवाजी नारायण काटे देशमुख हे माळेगाव खुर्दचे पहिले सरपंच म्हणून १९५५- ६५ असे दहा वर्षे काम केले आहे. सरपंच आदित्य काटे यांना सामाजिक कार्याची आवड असून युवा चेतना या सामाजिक संस्थेमार्फत ते सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.