हिमाचल प्रदेशात लोकसभेच्या चारही जागांसाठी ‘काटे की टक्कर’

 Himachal Pradesh Loksabha Election|  देशभरातील लोकसभा निवडणुकीच्या शेवटचे मतदान 1 जून 2024 रोजी पार पडणार आहे. यात हिमाचल प्रदेशात लोकसभेच्या चार जागांचा देखील समावेश आहे. येथे भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. 1 जून रोजी विधानसभेच्या 6 जागांवर पोटनिवडणुकीसाठी तसेच लोकसभेच्या सर्व जागांवर मतदान होणार आहे. हमीरपूर, कांगडा, मंडी आणि शिमला ही लोकसभा मतदार संघ आहेत.

हिमाचलच्या लोकसभेच्या 4 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात आहेत, तर सहा विधानसभा जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी 25 उमेदवार रिंगणात आहेत. धर्मशाला, लाहौल स्पीती, सुजानपूर, बडसर आणि गाग्रेट विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होत आहे. हिमाचल प्रदेशातील चारही लोकसभा जागांवर भाजप, काँग्रेस आणि बहुजन समाज पक्ष-बसपा यांनी आपले उमेदवार उभे केले आहेत.

मंडी लोकसभा मतदार संघ Himachal Pradesh Loksabha Election| 

मंडी लोकसभा जागेसाठी दहा उमेदवार रिंगणात आहेत. मंडी जागेवर अभिनेत्री आणि भाजप उमेदवार कंगना रणौत आणि काँग्रेसचे विक्रमादित्य सिंग यांच्यात लढत आहे. विक्रमादित्य सिंह यांच्या आई प्रतिभा सिंह या या मतदारसंघातून खासदार आहेत. बसपने येथून डॉ.प्रकाशचंद भारद्वाज यांना तिकीट दिले आहे. याशिवाय महेश सैनी, आशुतोष महंत (अपक्ष), दिनेश कुमार भाटी (अपक्ष), विनय कुमार (अखिल भारतीय परिवार पक्ष), नरेंद्र कुमार (राष्ट्रीय देवभूमी पार्टी), राखी गुप्ता (अपक्ष) आणि सुभाष मोहन स्नेही (अपक्ष) हिमाचल जनता पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

शिमला लोकसभा मतदार संघ

भाजपने सुरेश कुमार कश्यप यांना शिमला लोकसभेसाठी तिकीट दिले आहे. त्यांच्या विरोधात विनोद सुलतानपुरी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर बसपाने अनिल कुमार मांगे यांना उमेदवारी दिली आहे.

हमीरपूर लोकसभा मतदारसंघ Himachal Pradesh Loksabha Election| 

केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर हे स्वतः हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अनुराग सिंह ठाकूर यांना काँग्रेसचे सतपाल रायजादा आव्हान देत आहेत. हेमराज बसपकडून निवडणूक लढवत आहेत.

कांगडा लोकसभा निवडणूक Himachal Pradesh Loksabha Election| 

कांगडा लोकसभा जागेबाबत बोलायचे झाले तर, बहुजन समाज पक्षाने रेखा चौधरी, भाजपने डॉ. राजीव भारद्वाज आणि काँग्रेसने आनंद शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय हिमाचल जनता पक्षाकडून नारायण सिंह डोगरा, अचल सिंग (अपक्ष), केहर सिंग (अपक्ष), संजय शर्मा (अपक्ष), देवराज भारद्वाज (राष्ट्रीय समाज दल) आणि भुवनेश कुमार (राष्ट्रीय देवभूमी पार्टी) हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने चारही जागा जिंकल्या होत्या, परंतु 2021 मध्ये मंडी मतदारसंघातील भाजप खासदार राम स्वरूप शर्मा यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक झाली होती. प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रतिभा सिंह यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. यावेळी प्रतिभा सिंह यांच्या जागी त्यांचा मुलगा विक्रमादित्य सिंग निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे.

आत्तापर्यंत हिमाचल प्रदेशातील चारही जागा भाजपच्या ताब्यात होत्या, मात्र मंडी जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रतिभा सिंह यांनी ही जागा भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेतली. आता या वेळीही चारही जागा जिंकण्यात भाजप यशस्वी होणार की काँग्रेसचे हे 4 जूनलाच स्पष्ट होईल.

हेही वाचा: 

पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलून गेले ,’गांधींना कोणी ओळखत नव्हतं, चित्रपट बनला तेव्हा त्यांना जगभरात ओळख मिळाली’