पुण्यातील कात्रज चौक ‘जॅम’

– धिरेंद्र गायकवाड

कात्रज – पुणे महानगरपालिकेच्या बसेससाठी कात्रज चौकातील पिकअप पॉईंट रूंद करण्यात आल्याने या चौकामध्ये वाहतूक कोंडी सुरळीत होण्याऐवजी या थांब्याजवळ आता रिक्षांची गर्दी होऊ लागली आहे. किनारा हॉटेलजवळ तसेच जीएसपीएम कार्यालयासमोरील बस पिकअप पॉईंट येथेही अनेक रिक्षांसह अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहने थांबत असून अवैध प्रवासी वाहतुकीमुळे कात्रज चौक पुन्हा एकदा जॅम झाला आहे.

वाहतूक विभागाकडून रिक्षा स्टॅन्डकरीता स्वतंत्र परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच, करोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियम ठरवून रिक्षा चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे; परंतु कात्रज चौक परिसरात वाट्टेल तेथे रिक्षा थांबविल्या जात आहेत. अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहनेही वाट्टेल तेथे थांबत आहेत. यातून प्रवासी मिळवण्यासाठी अशा चालकांची स्पर्धा लागत असल्याने वाहतूक तसेच करोना सुरक्षिततेचे नियमही मोडले जात आहेत.

विनामास्क प्रवासी बसवू नये तसेच चालकांनीही मास्क वापरावा, असा नियम असताना अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे रिक्षात केवळ दोन प्रवाशांना परवानगी दिलेली असताना विनामास्क प्रवासी कोंबले जात आहेत, अशा चालकांमुळे प्रमाणिकपणे नियमांतर्गत परवानाधारक रिक्षा व्यावसाय करणाऱ्या चालकांवर याचा परिणाम होत आहे.

कात्रज चौक अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी व्यापल्याने बस वळविणे, उभी करणे यात अडथळे येत आहेत. अनधिकृत थांब्यामुळे सिग्नलला ताटकळलेली वाहने शहराबाहेर पडतानाही अडचण निर्माण होत आहे. कोंढव्याकडून येणारी अवजड वाहने तसेच स्वारगेट येथून येणारी वाहने, बसेस, एसटी यामुळे या चौकाचे रूंदीकरण करूनही वाहतूक कोंडी होत आहे. यासाठी वाहतूक पोलिसांनी सूचना करणे गरजेचे आहे.

कात्रज येथे चौकामध्ये नव्याने रुंदीकरण करण्यात आले आहे. पालिकेच्या बसेससाठी पिकअप पॉईंटदेखील नव्याने करण्यात आला आहे. मात्र, हे सर्व करताना तेथील रिक्षास्टॅन्ड काढून इतरत्र हलविणे गरजेचे होते. प्रवासी मिळण्यात त्यांना अडचणी होत असल्याने इकडे-तिकडे रस्त्यावर रिक्षा थांबविल्या जातात. पालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून ही समस्या आम्ही सांगितली असून रिक्षासाठी दुसरीकडे थांबा देण्यात यावा, अशी सूचना केली आहे.
– कृष्णकुमार इंदलकर, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा


कात्रज चौक-देहूरोड बाह्यवळण रस्त्यावर आयसीआयसीआय बॅंक समोर रिक्षांसाठी थांबा देण्यात आलेला आहे. मात्र, त्या ठिकाणी रिक्षाचालक रिक्षा थांबवत नाहीत. वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षकांना आम्ही मागील वेळी याठिकाणी थांबा दिला आहे, असे सांगितले आहे. तरीही कात्रज चौक बस थांब्याजवळ रिक्षा थांबत असतील तर, वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांवर कारवाई करावी.
– प्रशांत कुंभार, उप अभियंता, पथविभाग पुणे मनपा.


कात्रज चौक येथील रुंदीकरणाबरोबरच पीएमपीएल बस पिकअप पॉईंटचे काम सुरू असून या कामांमध्ये चौकातील अतिक्रमणे अडचण ठरत आहेत. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रार करूनदेखील कात्रज चौकातील अतिक्रमणाचा विळखा सुटत नाही. वाहतूक पोलीस विभागामार्फत कात्रज येथील अनधिकृत वाहने व अवैध प्रवासी वाहतूक यांच्याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. कात्रज चौकामध्ये घडणाऱ्या अपघातांना वाहतूक विभागच जबाबदार आहे.
– अमृता अजित बाबर, नगरसेविका 

Leave a Comment