केसीआर म्हणाले – ‘आम्ही इंडिया किंवा एनडीए यांच्यापैकी कोणाबरोबरच नाही’

हैदराबाद – आमचा भारत राष्ट्र समिती हा पक्ष विरोधी इंडिया आघाडीसोबत नाही किंवा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसोबतही नाही. दोन्ही पक्षांना आम्ही समान अंतरावर ठेवण्याचे ठरवले आहे असे बीआरएस पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी स्पष्ट केले आहे. तथापि, देशाच्या राजकारणात आम्ही एकाकीही नाही, कारण, आमच्याबरोबर अन्य मित्र पक्षही आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

नव्याने स्थापन करण्यात आलेली इंडिया आघाडी म्हणजे काय? असा सवाल करून त्यांनी म्हटले आहे की, त्यांनी 50 वर्षांहून अधिक काळ देशावर राज्य केले परंतु त्यांना देशात कोणताही बदल घडवता आलेला नाही. देशात चांगले बदल व्हायला हवेत, हे बदल घडवणे एनडीए आघाडीलाही जमलेले नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तयारीबाबत त्यांनी सांगितले की, बीआरएस विविध स्तरांवर संघटनात्मक समित्या स्थापन करत आहे आणि महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. 14.10 लाख कार्यकर्त्यांची एक ब्रिगेड तयार केली गेली आहे आणि पश्‍चिम महाराष्ट्रात आम्ही प्रत्यक्ष जमीनवर काम सुरू केले आहे.

महाराष्ट्रातील दलितांच्या सततच्या संघर्षावर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, या समाजावर अन्याय होत आहे. आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सांगितले की, प्रख्यात मराठी कवी आणि समाजसुधारक अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहे.