अशी ठेवा हेल्दी लाईफ

– सुजाता जाधव

आरोग्य म्हणजेच निरोगीपण. वारंवार आजारी न पडणे अथवा क्वचितच आजारी पडलो तरीही त्यातून लवकर बरे होणे. ऊन, वारा, पाऊस यासारख्या वातावरणातील बदलामुळे उद्‌भवणाऱ्या आजारांविरुद्ध प्रतिकार शक्‍ती चांगली असणे. आहारात झालेला बदल सहन करता येणं म्हणजेही आरोग्य. याशिवायही आपण निरोगी आहोत हे कसे जाणावे? तर आपल्याला सुखाने झोप येणं, सकाळी जाग आल्यावर हुशारी वाटणं. वात, मल, मूत्राचे व्यवस्थित विसर्जन होणे, भूक लागून अन्न घ्यावेसे वाटणं. घेतलेल्या अन्नाचे नीट पचन होऊन उत्तम बल, वर्ण, आयुष्य प्राप्त होणे. इंद्रिये व मन सुप्रसन्न असणे ही सर्व आरोग्यसूचक लक्षणे मानली जातात.

वयोगटानुसार आरोग्य मिळवण्यासाठी सध्याची जन माणसातील चालू असलेली धडपड किंवा प्रयत्न पाहूया.
बाल गट – आपल्याकडे मूल जन्माला आल्यापासून त्याचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी त्याला गुटी देण्याची पद्धत आहे. त्यासोबत मालीश करणे, वेळेवर दूध, शांत झोप येईल याची सर्वजण काळजी घेतात. पुढे वाढत्या वयाप्रमाणे दूध, पनीर,चीज, अंडी, फळं, भाज्या दिल्या जातात. व्यायामासाठी निरनिराळे क्‍लासेस लावणे, याकडे लक्ष दिले जाते.

तरुण गट – या गटातील लोक त्यांच्या वाचनात आलेल्या चार्ट प्रमाणे आपला आहार ठरवून घेताना दिसत आहेत. त्यामधे प्रोटीन्स अधिक मिळावे म्हणून मोड आलेली कडधान्य, दूध, अंडी, चीज, बटर, ड्राय फ्रुट्‌स, मिल्क शेक, फळांचे ज्यूस, मांसाहार घेत आहेत. कंपन्यांचे प्रोटीन्स, विटामिन्स घेणे, ड्युटीमधून वेळ मिळेल त्यावेळी व्यायाम करणे किंवा जिमला जाणे. जेव्हा वेळ असेल त्यावेळी झोप घेणे. जास्त करुन दिवसा झोपण्याचे प्रमाण वाढले आहे. अम्लपित्तासारखे पित्ताचे आजार, स्थूलता,डायबेटिस, कोलेस्टेरॉल, थायरॉइड, कफाचे आजार असणाऱ्यांसाठी हे अयोग्य आहे. तसेच याने स्नायूंमध्येही दुर्बलता येते.

वृद्ध गट – चाळीशीनंतर हळूहळू आहार कमी झाल्यामुळे तो पौष्टिक असावा याकडे कल असतो. त्यासाठी दूध, तूप, चीज, बटर, ड्राय फ्रुट्‌स, मिल्क शेक, फळांचे ज्यूस, चिकन-मटण सूप, हिरव्या पालेभाज्या, निरनिराळे सूप घेतात. त्यासोबत सकाळी आवळा, कोरफड, भोपळा, कारले, बीट, तृण रस आदी घेत आहेत. काहीजण च्यवन प्राश, मोरावळा घेतात. करोनापासून तर घरातील सर्वांनाच गरम काढे घेण्याची सवयच केली आहे. कॅल्शियम, व्हिटॅमिन्स, रक्‍तवाढीची औषधंही वारंवार घेतली जातात.
यासोबतच योगा, प्राणायाम, फिरायला जाणे, वेळेवर जेवण, विश्रांती घेणे, सध्या तरुण व वृद्ध दोघेही शरीर शुद्धीसाठी पंचकर्म करणे, इतरही काही शिबिरात जाणे, मालीश यासारख्या अनेक गोष्टी आरोग्य मिळविण्यासाठी करत आहेत.

वरती उल्लेख केलेल्या सर्वच्या सर्व गोष्टी आरोग्यासाठी नक्‍कीच हितकर आहेत. परंतु त्या प्रकृतीनुसार, ऋतूनुसार, प्रमाणानुसार विचार करून केल्या तरच आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळवून देण्यास हितकर होतील. नसता त्यांच्या अतिरेकाने त्या रोग निर्माण करणाऱ्या ठरतील. परंतु सध्याच्या धावपळीच्या दिनचर्येमधे यासाठी विचार करायला वेळच आहे कुठे? आम्ही पैसे देऊ तुम्ही आम्हाला आरोग्य द्या अशी वृत्ती झाली आहे. हे शक्‍य आहे का? तर याचे उत्तर नाही, कदापीही शक्‍य नाही. निरोगी दीर्घायुष्य हे माझे माझ्या हातात आहे. त्यासाठी आयुर्वेदात सांगितलेले सोपे आणि सहज करता येणारे काही नियम पाहू.
1) सकाळीच उठणे – पहाटे 3-5 यावेळेत उठणे.

याने वात, मल, मूत्र यांचे व्यवस्थित विसर्जन होऊन शरीर हलके होते. जसे अस्वच्छ जागेत आपण बसू शकत नाही, तसेच अस्वच्छ शरीरात मन प्रसन्न राहू शकत नाही.तरूण पिढीत रात्रीचे जागरणाची सवय वाढत आहे. तसे न करता सकाळी लवकर उठणे हिताचे ठरेल. याची सवय करावी लागेल. व्यवसाय, नोकरीमुळे, आजारामुळे जागरण होत असल्यास दुसऱ्या दिवशी न जेवता जागरणाच्या अर्धा वेळ झोपावे.उठल्यावर जेवावे.
2) इंद्रियांची स्वच्छता – सकाळी उठल्यावर डोळे, दात, हिरड्या, जीभ, तोंड, कान स्वच्छ करणे.
3) व्यायाम – आपल्या शक्‍तीच्या अर्ध शक्‍ती व्यायाम करावा. ऊन्हाळ्यात अतिव्यायाम टाळावा. खूप धाप लागेल असा व्यायाम मुळीच करू नये.

4) स्नान – स्नानामुळे त्वचेचे आरोग्य सुधारून उत्तम बल प्राप्त होते.बऱ्याच जणांमध्ये स्नान न करण्याची अथवा अवेळी (जेवणानंतर, रात्री) स्नानाची सवय दृढ होत आहे. हे योग्य नाही.
5) आहार – सकाळचे द्रव पदार्थांचे सेवन- साधे पाणी, गरम पाणी, सिद्ध जल, रस, काढे, मध+लिंबू पाणी, चहा, दूध, कॉफी इत्यादी.
तहान असेल तरच पाण्याचे सेवन करावे. काल घेतलेला आहार पचून भुकेची जाणीव असेल तरच चहा, दूध आदी घ्यावे अन्यथा घेऊ नये.
चहा, दूध घेणे गरजेचे असल्यास एखाद्या लहान कपाएवढेच घ्यावे. खूप मोठा कप/ग्लासभर घेऊ नये.
नाश्‍ता- भुकेच्या प्रमाणात व पचनास हलका नाश्‍ता असावा जेणेकरून दुपारी भूक लागेल.

दुपारचे जेवण – आपल्या उदरामध्ये जाठराग्नी असतो, यज्ञामध्ये जसे आपण पवित्र वस्तूेंची आहुती देतो त्याप्रमाणेच आपले जेवण स्वच्छता पाळून केलेले ताजे गरम सुपाच्य असावे. ताक, लोणचं, पापड, चटण्यांचे प्रमाणात आहार पचण्यास मदत होईल एवढ्या मात्रेतच आपल्या प्रकृतीनुसार सेवन करावे. पाणी आवश्‍यकतेनुसार मधून मधून प्यावे. जेवणानंतर चूळ भरावी. याने तोंड स्वच्छ राहते. डायबेटिजसारख्या आजारामध्ये तोंड अधिक प्रमाणात अस्वच्छ असते.

जेवणानंतर डाव्या कुशीवर थोडी विश्रांती घ्यावी. काम करावे लागत असल्यास जास्त धावपळीची अथवा कष्टाची कामं करू नये. त्याने पचन नीट होत नाही.

सायंकाळचे जेवण- सायंकाळी 6-7 वाजेपर्यंत दुपारच्या जेवणाचे पूर्ण पचन होऊन कडक भूक असताना घ्या. भूकेच्या प्रमाणात आपल्याला सहन होणारे पचण्यास हलके पदार्थच घ्यावे.

6) रात्रीची झोप – साधारण जेवणानंतर 3 तासाने झोपावे. झोपण्यापूर्वीही दात, हिरड्या, तोंड स्वच्छ करावे.
याप्रकारे स्वत:च स्वत:चे परीक्षण करून वरीलप्रमाणे आपल्या दिनचर्येमधे बदल केल्यास नक्कीच फायदा होताना दिसतो. या सर्व वेळा स्वस्थ व्यक्तींना धरून आहेत. बाल, वृद्ध, गर्भवती, बाळंतीण, आजारी यांनी जमेल त्यानुसार करावे.
अशी जीवनशैली ठेवल्यास माझे आरोग्य माझ्या हातात हा आत्मविश्‍वास निर्माण होतो.