केजरीवाल – शीला दीक्षित यांच्यात “तू तू मैं मैं’

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान सुरू असताना दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात ट्‌विटरवर शेरेबाजीचा एक मस्त सामना रंगला. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पलिकडे जाऊन दिल्लीवासियांनी या दोन आजी-माजी मुख्यमंत्र्यांची ही रस्सीखेच छान एन्जॉय केली.

शीला दीक्षित यांच्या ईशान्य दिल्ली मतदारसंघात आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते दीक्षित यांच्या प्रचारात सहभागी नसण्याचे कारण त्यांची प्रकृती ठीक नाही, असे बोलू लागले होते. त्यावर आपल्या आरोग्याबाबत अफवा का पसरवत आहात, असा प्रश्‍न शीला दीक्षित यांनी केजरीवाल यांना विचारला. “जर तुम्हाला माझ्या आरोग्याबाबत काहीच घेणे देणे असेल, तर घरी येऊन चौकशी करा आणि जेवणाचा आस्वादही घ्या. अफवा न पसरवता निवडणूक लढवायलाही शिका.’ असे शीला दीक्षित यांनी केजरीवाल यांना उद्देशून ट्‌विट केले.

त्यावर केजरीवाल यांनी त्वरित प्रत्युत्तर दिले. “तुमच्या आरोग्याबाबत मी कधी काय बोललो? माझ्या कुटुंबाने मल वरिष्ठांचा मान राखायला शिकवले आहे. परमेश्‍वर तुम्हाला चांगले दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य देवो. तुम्ही उपचारांसाठी विदेशात गेला होता. तेंव्हा मी न बोलावता, तुमच्या चौकशीला आलो होतो. तुमच्या घरी मी जेवण्यासाठी कधी येऊ ?’ असे केजरीवाल म्हणाले.

याच दरम्यान शीला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित यांनीही फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यामध्ये ते स्वतः कुटुंबीय आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसह जेवताना दिसत आहेत. शीला दीक्षित यांची प्रकृती ठीक नसून त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे, अशी अफवा “आप’कडून पसरवली जात असल्याची टीका कॉंग्रेसच्या मिडीया कमिटीच्या सदस्या परवेझ यांनीही केली आहे. या अफवेबाबत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जाफराबाद पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.

Leave a Comment