दारू घोटाळ्याच सत्य येणार समोर ! केजरीवाल उद्या कोर्टापुढे पुराव्यासह मांडणार तथ्य..

नवी दिल्ली – आपले पती अरविंद केजरीवाल हे कथित अबकारी कर घोटाळ्याच्या प्रकरणातील नेमके तथ्य कोर्टापुढे उघड करतील असे त्यांच्या पत्नी सुनीता यांनी स्पष्ट केले आहे. त्या म्हणाल्या की उद्या २८ मार्चला केजरीवाल कोर्टापुढे हे सत्य उघड करणार आहेत. दिल्ली अबकारी धोरण मनी लाँडरिंग प्रकरणात ईडी कोठडी संपल्यानंतर केजरीवाल यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

एका व्हिडिओ मेसेजमध्ये सुनीता केजरीवाल यांनी केंद्र आणि केंद्रीय तपास एजन्सीवर जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, ईडीला “तथाकथित दारू घोटाळ्यात” २५०हून अधिक छाप्यांमध्ये एक पैसाही सापडला नाही.

या तथाकथित दारू घोटाळ्यात, ईडीने २५०हून अधिक छापे टाकले आहेत. ते या तथाकथित घोटाळ्यातील पैशांचा शोध घेत आहेत. त्यांना अद्याप काहीही सापडले नाही. अरविंद केजरीवाल या बाबतीत २८ मार्च रोजी न्यायालयात सर्वकाही उघड करणार आहेत. दारू घोटाळ्याचा पैसा कुठे आहे हे ते उघड करतील आणि त्याचा पुरावाही देतील असे त्या म्हणाल्या. सुनीता यांनी मंगळवारी संध्याकाळी ईडी कार्यालयात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

त्या म्हणाल्या की, मी काल अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात भेट घेतली, त्यांना मधुमेह आहे आणि साखरेची पातळी नियंत्रणात नाही. मात्र, त्यांचा निर्धार पक्का आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीचे मंत्री आतिशी यांना पाणी आणि गटारसंबंधित समस्या सोडवण्याचे निर्देश दिले. त्यांनी काय चूक केली? त्यासाठी केंद्राने अरविंद केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांना दिल्ली संपवायची आहे का? असा सवालही त्यांनी केला.