Ultimate Kho-Kho League : ‘खो-खो’ खेळाला आंतरराष्ट्रीय ओळख देणार

पुणे  – भारतात क्रिकेट वगळता इतर खेळाडूंना म्हणावे तसे महत्त्व मिळाले नाही. खो-खोबद्दल बोलायचे झाल्यास हा आपल्या मातीतला खेळ आहे. अनेकांनी देशात खो-खो हा खेळ संपला असल्याचे म्हटले.

मात्र, लीगच्या माध्यमातून आम्ही या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या उंचीवर नेण्याकरता खेळाडूंना योग्य संधी आणि पाठिंबा देणार आहोत. ही लीग येणाऱ्या काळात अनेकाच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे मुंबई खिलाडीज संघाचे सहमालक पुनित बालन यांनी म्हटले आहे.

अल्टिमेट खो-खो लीगच्या पहिल्या हंगामात मुंबई खिलाडीज संघाचा सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल, असा मानस संघाचा कर्णधार विजय हजारे याने व्यक्‍त केला.

मुंबई खिलाडीज संघाचे मालक पुनित बालन, जान्हवी धारिवाल बालन, गायक बादशाह यांच्या उपस्थितीत मुंबईत संघाच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. या वेळी संघातील सर्व खेळाडूंसह मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर श्री, मुख्य प्रशिक्षक राजेंद्र साप्ते आणि सहायक प्रशिक्षक शोभी आर. उपस्थित होते. अल्टिमेट खो-खो लीग 14 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान पुण्याच्या म्हाळुंगे बालेवाडीत होणार आहे.