गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; 2 कोटीं रूपयांच्या खंडणीची मागणी

बीड – जिल्ह्यातील केज तालुक्यालगतच्या महामार्गावरील टोल नाक्याजवळ गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्पराच्या अधिकाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. आरोपींनी त्यांच्याकडे तब्बल 2 कोटींची खंडणी मागितल्याची माहिती आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, अवादा या पवनचक्की प्रकल्पाच्या उभारणीचे काम करणारे सुनील केदु शिंदे व त्यांचे सहकारी मंगळवारी रात्री बीडहून केजकडे जात होते.

रात्री 11 च्या सुमारास मस्साजोग ते केज मार्गावरील गंगा माऊली साखर कारखान्यालगत असणाऱ्या टोल नाक्यापुढे एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओच्या (एम एच 15 ईबी 2682) चालकाने इशारा करून त्यांची गाडी थांबवली.

त्यानंतर रमेश घुले (रा. केज) नामक व्यक्तीने त्याच्याकडील गावठी कट्ट्याच्या बळावर सुनील शिंदे यांचे अपहरण केले. तसेच 2 कोटी रुपयांची मागणी केली.