किडनी आरोग्य : क्रॉनिक किडनी डिसीज एक सायलेंट किलर

क्रॉनिक किडनी डिसीज अर्थात सीकेडी म्हणजे काही महिने किंवा वर्षांमध्ये मूत्रपिंडाच्या कार्यात वेगाने होणारा बिघाड. मूत्रपिंडात नेफ्रॉन नावाचे एक दशलक्ष लहान फिल्टर्स असतात. नेफ्रॉनमध्ये बिघाड झाला तर त्यांचे कार्य थांबते. एका विशिष्ट वेळेनंतर शरीर निरोगी ठेवण्यासाठी शिल्लक राहिलेले नेफ्रॉन योग्य प्रकारे रक्त शुद्ध करू शकत नाहीत. सीकेडी हा भारतात एक क्रॉनिक अर्थात तीव्र असा रोग उदयास आला आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे वाढते प्रमाण हे सीकेडीच्या वेगाने वाढणाऱ्या घटनांमागील मुख्य कारण आहे.

नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार, भारतात प्रति एक दशलक्ष लोकसंख्येमागे ईएसआरडी अर्थात एंड स्टेजर रेनल डिसीजची संख्या 22 आहे व दरवर्षी एक लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण रेनल रिप्लेसमेंट प्रोग्राममध्ये प्रवेश करतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, सीकेडीचे जागतिक स्तरावरील प्रमाणही वाढत आहे. वर्ष 2040 मध्ये मानवी आयुष्याचा काळ कमी होण्यामागील सर्वसामान्य कारणांमध्ये याचा समावेश असेल.

त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जगभरातील मूत्रपिंडाच्या आजाराच्या वाढत्या प्रमाणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी व तसेच मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी सर्वत्र, सगळेच जण प्रयत्न करत आहेत. मूत्रपिंडाच्या आजारात प्राथमिक प्रतिबंधासाठी जीवनशैलीत बदल करणे आणि मधुमेह व रक्तदाबासह, आरोग्यास हानिकारक, मूत्रपिंडातील संरचनात्मक विकृती तसेच मूत्रमार्गातील जंतूंचा समावेश कमी करणे आवश्‍यक आहे. मूत्रपिंडाच्या आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी या आजारासाठी कारणीभूत ठरणारे जोखीमीचे घटक व प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जागरूकता वाढवणे व लोकांना प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्‍यक आहे.

जोखीमीचे घटक –
उच्च रक्तदाब
अनियंत्रित मधुमेह
स्थूलपणा आणि अतिवजन
वाढते वय (50 वर्षांच्या पुढे अधिक लक्ष)
धूम्रपान व मद्यसेवन
आनुवंशिक मूत्रपिंड आजार
वरीलपैकी कोणताही घटक तुमच्याशी संबंधित असेल तर तुम्ही तज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घेण्याची हीच योग्य वेळ आहे.

आपली किडनी निरोगी ठेवण्यासाठी…

निरोगी रहा, सक्रिय रहा – शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करा. रक्तदाब जास्त असेल तर तो कमी करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून किडनीचे गंभीर आजार होणार नाहीत.

पौष्टीक आहाराचे सेवन – मीठ कमी प्रमाणात खा. सोडियमचे आहारातील योग्य प्रमाण म्हणजे दर दिवसाला फक्त 5 ते 10 ग्राम मीठ खावे.

धूम्रपान टाळा – धूम्रपानामुळे मूत्रपिंडाकडे जाणारा रक्तप्रवाह मंदावतो. त्यामुळे धूम्रपान करू नये. यामुळे मूत्रपिंडाचा कर्करोग होण्याची शक्‍यता 50% वाढते.

योग्य द्रवपदार्थ सेवन करावे – सामान्य तापमानात निरोगी व्यक्तीने 8 कप म्हणजेच जास्तीत जास्त 2 लिटर द्रव पदार्थ सेवन करावेत.

दाहकविरोधी किंवा वेदनाशामक औषधे अति प्रमाणात किंवा नियमित घेणे – नॉनस्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी सारखी सामान्य औषधे किंवा विविध प्रकारची वेदनाशामक औषधे नियमित घेतल्यास मूत्रपिंडाला धोका संभवू शकतो.

प्रत्येकाने आपली रक्तशर्करा नियमित तपासून घ्यावी व ती नियंत्रित ठेवावी.रक्तदाब तपासणे आणि तो नियंत्रणात ठेवणे, हे खूप महत्त्वाचे आहे.
मानवी शरीर त्याची रचना कार्य हे सर्व म्हणजे एक अद्‌भूत चमत्कार आहे. मनुष्य त्याची नक्कल करून एकेक यंत्र बनवू पाहात आहे. काहीअंशी या प्रयत्नांना यशही आलेले आहे उदा. तरीपण या यंत्रांपेक्षा मानवी शरीर आणि त्यातील अवयव यांना पर्यायच नाही. आपल्या शरीरात अद्‌भूतपणे काम करणाऱ्या अवयवांपैकी किडनीची रचना, कोणत्या परिस्थितीत किडनी कसे काय काम करते आणि किडनीला जर व्यवस्थितपणे योग्य प्रमाणात काम करता आले नाही तर आजार कसे काय निर्माण होतात, हे पहाणेही रंजक ठरणार आहे…

किडनीची रचना आणि कार्ये
आपल्या किडनी बळकट, गुळगुळीत, स्निग्ध म्हणजे तेलकट किंवा तुकतुकीत आणि ओलसर स्वरूपात असतात. पाण्यात राहणारे मासे, हंस यांच्या अंगावर एक विशिष्ट प्रकारचे तेल असते. जलतरणपटूसुद्धा पोहताना अंगाला एक विशिष्ट प्रकारचे तेल लावूनच मग पाण्यात उतरतात. त्यामुळे पाण्याचा परिणाम त्यांच्या त्वचेवर होत नाही. पाण्यामुळे त्वचा सुरकुतत नाही किंवा की खंगत नाही. त्याचप्रमाणे रक्तातील विषारी द्रव्ये वेगळी करून बाहेर काढताना या स्निग्धतेमुळे किंवा तेलकटपणामुळे किडनीवर जरादेखील परिणाम होत नाही.

तसेच स्नेह गुणांमुळे किडनी तेलकट, तुकतुकीत आणि गुळगुळीत राहिल्यामुळे रक्तातील द्रव पदार्थ झटकन निघून जातात. किडनीत शोषले जाण्याचा किंवा अडकून राहण्याचा संभव कमी असतो. कोरड्या भागात ओल शोषली जाते. ओलसर भागात ओल शोषली जात नाही. किडनी मुळचीच ओलसर स्वरूपात असते. त्यामुळे रक्तातील द्रवभाग शोषला जाण्याची शक्‍यता नसते. जर किडनीचे स्वरूप ओलसर न राहता कोरडी राहिली असती तर रक्तातील द्रवभाग पर्यायाने त्या द्रव भागातील विषारी द्रव्येसुद्धा किडनीत शोषली गेली असती.

आपल्या शरीरात मुठी एवढ्या आणि घेवड्याच्या आकाराच्या दोन किडन्या बरगड्यांच्या खाली मणक्‍याच्या दोन्ही बाजूला पाठीमागे असतात. प्रत्येक किडनीत अनेक छोट्या छोट्या गाळण्या असतात. दर दिवशी किडन्या साधारणतः 600 मि.ली. ते 2500 मि.ली लघवी तयार करतात. लघवी तयार करतात म्हणजे रक्त गाळून रक्तातील टाकाऊ घटक शरीराला अपायकारक असणारे घटक लघवीमार्फत बाहेर काढतात.

जर आपल्या शरीराला पाण्याची गरज असेल आणि काही कारणाने आपणास पाणी मिळत नसेल तर किडनी लघवीचे प्रमाण कमी करून किंवा गरजेप्रमाणे बंद करून शरीरात पाण्याचे नियमन करते. तसेच जर शरीरात पाण्याचे प्रमाण खूपच झाले तर लघवीचे प्रमाण वाढवून रक्तातील पाण्याचे संतुलन राखले जाते. रक्तातील सोडियम, पोटॅशियम, क्‍लोराईड या क्षारद्रव्यांचे प्रमाण जरादेखील कमी किंवा जास्त झाल्यास त्याचा परिणाम हृदयावर स्नायूंवर लगेचच होतो.

या क्षारद्रव्यांचे प्रमाण अगदी योग्य प्रमाणात ठेवण्याचे महत्त्वाचे काम किडनी करते. हाडांमधील मगजापासून रक्ताच्या पेशी तयार होतात. या क्रियेस किडनी चालना देते, मदत करते. किडनीमुळे रक्तदाबाचे नियमन केले जाते. ड जीवनसत्त्वाच्या निर्मितीमध्ये किडनीचा महत्त्वाचा वाटा आहे. ड जीवनसत्त्वामुळे हाडांमधील व रक्तामधील कॅल्शियम योग्य प्रमाणात राखले जाते.

– डॉ. शैलेश

Leave a Comment