सलून, ब्युटी पार्लरमध्ये AC सुरु ठेवल्यास कारवाई : महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई- राज्यात करोना रुग्णांची संख्या कमी झाल्य़ाने अनलॉकची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात आली आहे. यामध्ये पाच स्तर पाडण्यात आले असून त्यानुसार नियम ठरविण्यात आले आहेत. मुंबई शहराचा समावेश तिसऱ्या स्तरात असल्यामुळे शहरात दुकानांना ४ वाजेपर्यंत मुभा आहे. यामध्ये सलून, ब्युटी पार्लर आणि स्पा यांचाही समावेश आहे. मात्रा या दुकानदारांना एसी सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. एसी सुरु ठेवल्यास कारवाई करण्यात येणार येईल अशा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

स्पा, सलून 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. पण, दुकानदारांना एसी बंद ठेवावा लागेल. कारण या माध्यमातून कोरोना पसरू शकतो. एसी सुरु ठेवल्याचं आढळल्यास कारवाई करण्यात येईल. असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. मुंबईत रात्री ८ नंतर जमावबंदी आणि संचारबंदी एकत्रित सुरु राहील असेही यावेळी त्यांनी सांगितले.

मॉल्स, नाट्यगृहे, चित्रपटगृहे बंद असतील. लोकल अत्यावशक सेवेसाठी सुरु करण्यात आली आहे. बस सेवा सुरु असेल पण, प्रवाशांना उभे राहून प्रवासास परवानगी नसेल. पाचव्या स्तरातून येणाऱ्या खासगी वाहनांना मुंबईत परवानगी नसेल. हॉटेल, रेस्टाँरट यांना 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंस सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 4 नंतर त्यांना पार्सल सेवा सुरु ठेवता येईल. अशी माहिती महापौरांनी दिली आहे.

एवढ्या मोठ्या लॉकडाउननंतर आपण अनलॉक करत असताना काही नियम पाळले पाहिजेत. लोकांनी स्वयंशिस्त लावून घेतली तर पूर्ण अनलॉक होईल आणि मुक्त कारभार करु शकू. असा विश्वास महापौर पेडणेकर व्यक्त केला आहे.