कोहलीने घेतला संदीप शर्माचा धसका

अबुधाबी – भारताचा सर्वात महत्त्वाचा फलंदाज कर्णधार विराट कोहली याने संदीप शर्मा या गोलंदाजाचा जणू धसकाच घेतल्याचे चित्र दिसत आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात संदीपने कोहलीला तब्बल सात वेळा बाद केले आहे.

या स्पर्धेत संदीप सनरायझर्स हैदराबादकडून खेळला. त्याच्याकडे चेंडू स्विंग करण्याची अफाट क्षमता आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये घेतलेल्या 108 बळींपैकी जवळपास 50 टक्के बळी पॉवरप्लेमध्ये घेतले आहेत. संदीपने कोहलीला आयपीएलमध्ये सात वेळा बाद करत नवा विक्रमच साकार केला आहे.

संदीपच्या गोलंदाजीतील विशेष गोष्ट अशी आहे की, चेंडू रीलीज करताना होत असलेली मनगटाची स्थिती. त्याच्या शैलीमुळेच तो अन्य गोलंदाजांपेक्षाही चेंडू जास्त स्विंग करतो. कोहलीला त्याने जितक्‍या वेळा बाद केले त्यात स्विंग चेंडूच निर्णायक ठरले आहेत. संदीपने केवळ कोहलीलाच नव्हे तर, रोहित शर्मा व ख्रिस गेलला चार वेळा बाद केले आहे.

संदीपची आकडेवारी पाहिल्यास त्याने जसप्रीत बुमराहची जवळपास बरोबरी केली आहे. दोघांनी 90 सामने खेळले आहेत. बुमराहने 105 तर संदीपने 108 बळी घेतले आहेत. यंदा अमिरातीतील आयपीएल स्पर्धेत त्याने 11 सामन्यांत 7.34 या स्वप्नवत सरासरीने 13 बळी घेतले आहेत.

Leave a Comment