कोहलीचे भारतीय संघातील स्थानही धोक्‍यात, बीसीसीआयकडून संकेत

मुंबई  – भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली सातत्याने अपयशी ठरत असतानाच त्याचे आगामी टी-20 मालिकांसाठी भारतीय संघातील स्थानही धोक्‍यात आल्याचे संकेत बीसीसीआयकडून मिळत आहेत. याबाबत बीसीसीआयचा कोणताही सदस्य अधिकृतरीत्या काहीही बोलण्यास तयार नसला तरीही कोहलीने भारतीय क्रिकेटसाठी केलेली कामगिरी निश्‍चितच कौतुकास्पद आहे. मात्र, त्याला सध्या येत असलेले अपयश संघासाठी चिंताजनक असल्याचे सांगत बीसीसीआयने कोहलीलाच संघातून वगळले जाण्याचा धोका बोलून दाखवला आहे.

सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोहलीला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. तसेच त्याने 2019 सालानंतर एकही शतकी खेळी केलेली नाही. गेल्या जवळपास अडीच वर्षांत त्याची कामगिरी अत्यंत खालावलेली आहे. हे सर्व पाहता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील मालिकेसाठी विश्रांती दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्यानंतर भारतीय संघ आयर्लंड व इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असून, त्यातूनही कोहलीला वगळले जाण्याचे वर्तवले जात आहे.

आयपीएल स्पर्धेतील जवळपास प्रत्येक सामन्यात तो ज्या पद्धतीने बाद होत आहे ते पाहता त्याचा आत्मविश्‍वास खालावल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. बाद झाल्यावर तो पूर्वी स्वतःवरच चिडत असे हल्ली तो हसतो म्हणजेच त्याला स्वतःलाही त्याच्या बाद होण्याच्या पद्धतीमुळे निराश वाटत असेल. अशी देहबोली असेल तर तो आंतरराष्ट्रीय संघाकडून सरस कामगिरी कशी करेल, असा प्रश्‍न निवड समितीच्याच एका सदस्याने उपस्थित केल्याचेही वर्तवले जात आहे.

शतकाची प्रतीक्षा कायम

कोहलीने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांत अनुक्रमे 41, 12, 5, 48, 1, 12, 0, 0, 0 अशी कामगिरी केली आहे. त्याचबरोबर गेल्या अडीच वर्षांपासून त्याला शतकी खेळी करता आलेली नाही. त्याला एकेक धावा जमवतानाही कष्ट पडत आहेत. त्याची अशीच कामगिरी आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामन्यांतही राहिली तर त्याला भारताच्या टी-20 संघातील स्थानही गमवावे लागण्याची शक्‍यता आहे.