कोरेगाव-भीमा हिंसाचार : गौतम नवलखा यांना उच्च न्यायालयाने तूर्त दिलासा

12 जून पर्यंत दिलासा कायम

मुंबई – पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा हिंसाचारामागे माओवादी असल्याचा संशय असलेल्या गौतम नवलखा यांना उच्च न्यायालयाने तूर्त दिलासा दिला. न्या. रणजीत मारे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने गडचिरोलीतील हल्याच्या पार्श्‍वभूमीवर नवलखा यांनी उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा रद्द करण्याची राज्य सरकारची विनंती फेटाळून लावली आणि याचिकेची सुनावणी 12 जून पर्यंत तहकूब ठेवली. तो पर्यंत त्यांच्या विरोधात कारवाई न करण्याचे न्यायालयाने या पूर्वी पुणे पोलीसांना दिलेले आदेश कायम ठेवले.

माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी आपल्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करुन घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारच्यावतीने सरकारी वकील ऍड. अरूणा कामत – पै यांनी यांनी याचिकेला जोरदार विरोध केला. महाराष्ट दिनाच्या दिवशी गडचिरोलीत झालेल्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर ऑक्‍टोबर पासून नवलखा यांना न्यायालयाने अटकेपासून दिलेला दिलासा रद्द करावा अशी विनंती केली.

मात्र न्यायालयाने राज्य सरकारची ही विनंती अमान्य करताना यापूर्वी न्यायालयाने दिलेला दिलासा याचिकेवर
सुनावणी झाल्या शिवाय रद्द करणे योग्य नाही, असे स्पष्ट केले आणि पुढील सुनावणी 12 जून पर्यंत तहकूब ठेवली.

Leave a Comment