कोटक बॅंकेकडून घर गृहकर्जावरील व्याजदरात वाढ!

मुंबई – दोन वर्षापासून गृहकर्जावरील व्याजदर कमी पातळीवर आहेत. मात्र आता महागाई वाढण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बॅंकेने गृहकर्जावरील व्याजदरात 0.05 टक्‍क्‍यांची वाढ जाहीर केली आहे.

सध्या या बॅंकेचे गृहकर्जावरील व्याजदर 6.50 टक्‍क्‍यापासून सुरू होतात. आता हे व्याज दर 6.55 टक्‍क्‍यापासून सुरू होतील असे बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. व्याजदर कपातीवेळीही ही बॅंक आघाडीवर होती. सप्टेंबर महिन्यामध्ये उत्सवाच्या काळासाठी या बॅंकेने व्याजदरात कपात केल्यानंतर इतर बॅंकांनीही व्याजदरात कपात केली होती.

आता या बॅंकेने व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. या बॅंकेचे ग्राहक व्यवहार विभागाचे प्रमुख अंबुज चंदना यांनी सांगितले की आम्ही व्याजदरात कपात केल्यानंतर देशभरातील ग्राहकांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद दिला. 

सगळेच प्रश्न अतिरिक्त भांडवलामुळे सुटत नसतात. त्यामुळे काही निर्णय योग्य वेळेवर घेणे अपेक्षित असते. त्यामुळेच बॅंकेने व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली असल्याचे समजले.