पुणे | कसबा नव्हे तर कोथरूड नवे सत्ताकेंद्र

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुण्यातील सत्ताकेंद्र म्हणून कसबा विधानसभा मतदारसंघाकडे अवघ्या काही वर्षांपर्यंत पाहिले जात होते. मात्र, हे सत्ताकेंद्र आता कसब्याकडून कोथरूडकडे स्थलांतरीत झाले आहे. भाजपकडून ज्येष्ठ नेते आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे राज्याच्या मंत्रीमंडळात आहेत. तर नुकतेच भाजपने राज्यसभेवर प्रा. मेधा कुलकर्णी यांना संधी दिली आहे.

आता पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी भाजपने कोथरूडमधूनच माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिली आहे. या शिवाय, भाजपचे पक्ष कार्यालयही कोथरूडमध्ये कायमस्वरूपी कोथरूड विधानसभा मतदारसंघातच असणार आहे. त्यामुळे पुढील काही वर्षे भाजपचे सत्ताकेंद्र कोथरूडच असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपने काही वर्षांपूर्वी कसबा विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या भागात कार्यालयातून बराच काळ काम केल्यानंतर शिवाजीनगर भागात कार्यालय सुरू केल्याने हळूहळू बदल सुरू झाला. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत शिवाजीनगर मतदारसंघातील अनिल शिरोळे हे लोकसभेवर निवडून आले होते, मात्र २०१९ मध्ये लोकसभेवर निवडून येईपर्यंत जिल्ह्याचे पालकमंत्रीपद तत्कालीन आमदार व कसबा विधानसभेचे रहिवासी गिरीश बापट यांच्याकडे होते. या कालावधीत पक्षातील सर्व महत्वाची पदे कसबा मतदारसंघातच दिली जात होती.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीनंतरही महापालिकेतील महापौर तसेच सभागृहनेते पद बहुतांश काळ कसबा विधानसभा मतदारसंघातच देण्यात आले. मात्र २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दिवंगत खासदार गिरिश बापट यांना उमेदवारी दिली, बापट अपेक्षेनुसार, मोठ्या मत्ताधिक्क्याने खासदारही झाले.

मात्र, त्यानंतर लगेच २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून कोथरूड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांचे तिकिट कापत ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि पुण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर, कसब्याचे सत्ताकेंद्र कोथरूडकडे सरकण्यास सुरूवात झाली.

सर्वांत आधी महापौरपद कोथरूडचे असलेले मुरलीधर मोहोळ यांना सलग तीन वर्षे देण्यात आले. त्याच वेळी राज्याच्या मंत्रीमंडळातही चंद्रकांत पाटील यांना संधी देण्यात आली. त्यानंतर मागील वर्षी कसबा विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपला कसबा राखता आला नाही तर नंतर लगेचच गिरिश बापट यांच्या निधनाने प्रामुख्याने कसबा परिसरात पोकळी निर्माण झाली आणि भाजपने धोका पत्करण्याचे टाळले आणि एक वर्षांहून अधिक काळ लोटला तरी पुणे लोकसभा जागेची पोटनिवडणूक झाली नाही. त्यानंतर आता भाजपने आपले कार्यालय कोथरूडमध्ये हलविले असून राज्यसभेवर मेधा कुलकर्णी यांना संधी दिली आहे तर लोसभेचे तिकिटही कोथरूड मध्येच दिले आहे.