‘कृष्णाला वाट पाहायला लावणार नाही, आता अयोध्येतून मथुरेकडे जाणार’ – योगी आदित्यनाथ

मुंबई – भगवान श्रीकृष्णाला वाट पाहायला लावणार नाही. आता आम्ही अयोध्येतून मथुरेकडे जाणार असे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. भाजपचे उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. संपूर्ण देशात जो उत्साह पाहायला मिळतो आहे तोच उत्साह महाराष्ट्र आणि मुंबईतही पाहायला मिळत असल्याचे योगी म्हणाले.

महाराष्ट्रातील लोकांनीही म्हटले आहे की दिल्लीत राज्य करणारा राम भक्त असेल. उज्ज्वल निकमही एक राष्ट्र भक्त म्हणून आमच्या सोबत आले आहेत. आपला जीव धोक्यात घालून भारताच्या सुपुत्रांना न्याय देणारे आमच्यासोबत आले आहेत. पुन्हा हल्ला करण्याची कोणाची हिंमत नाही असे उल्लेख करून काही दिवसांपूर्वी दहशतवादी कसाबच्या संदर्भात उपस्थित केल्या गेलेल्या मुद्द्याला योगींनी उत्तर दिले.

दरम्यान, महाराष्ट्रातील धुळे येथील प्रचारसभेत बोलताना योगी म्हणाले की कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणतात की त्यांचे सरकार आल्यावर ते राम मंदिर धुतील. मात्र तुम्ही अयोध्येपर्यंत पोहोचू शकाल अशा स्थितीतच तुम्हाला उत्तर प्रदेशची जनता ठेवणार नाही. इंडिया आघाडीसाठी ही निवडणूक लूटण्याचे माध्यम आहे. आमच्यासाठी ही निवडणूक भारताला जगातील सगळ्यांत मोठी शक्ती म्हणून प्रस्थापित करण्याचा संकल्प आहे.

जे लोक विचारतात मोदींनी काय केले त्यांना सगळ्यांत प्रथम सांगा त्यांनी २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. आजचा भारत हा नवा भारत आहे. आताची कॉंग्रेस महात्मा गांधींची कॉंग्रेस नाही. त्या कॉंग्रेसचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते. आताची कॉंग्रेस सोनिया कॉंग्रेस आहे, राहुल कॉंग्रेस आहे.