Kurla building fire : कुर्ल्यात इमारतीला भीषण आग, ३९ जण रुग्णालयात दाखल

Kurla building fire – कुर्ला पश्चिमेकडील एका इमारतीला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. कुर्ल्यातील कोहिनूर रुग्णालय परिसरात डॉ. भीमराव रावजी आंबेडकर ही 12 मजली इमारत असून शुक्रवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यावर आग लागली. या आगीच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले, त्यानंतर त्यांनी 50 ते 60 लोकांना सुखरूप बाहेर काढले.

ही आग एवढी भीषण होती की सुमारे 39 नागरिक जखमी झाले. यापैकी चार जणांना कोहिनुर रुग्णालयात (Kohinoor Hospital) आणि इतर 35 जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 4 जणांना घरी सोडण्यात आले. इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने अनेक रहिवासी इमारतीत (Building) अडकले होते. अनेकांना या धुराचा त्रास झाला.

कोणतीही जीवितहानी नाही

सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही. वेळेतच अग्निशमनल दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. मात्र या आगी मागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. या घटनेचा पोलीसांकडून अधिक तपास केला जात आहे.