ऑक्सिजनचा तुटवडा! “कृपया मला माझ्या पदावरून कार्यमुक्त कराव”; सुप्रिटेंडेंट डॉक्टरची विनंती

पाटणा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात टाइम घातले आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातही बिहारमधील पटणा येथील रुग्णालयातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरचा तुडवडा निर्माण होण्याची चिन्हे असल्याने कोरोना रुग्णावर उपचार करणारे नालंदा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे मेडिकल सुप्रिटेंडेंट डॉक्टर विनोद कुमार सिंह यांनी आरोग्य विभागाचे मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांना पत्र लिहून आपल्याला कार्यमुक्त करण्याची विनंती केली आहे.

डॉ. सिंह यांनी या पत्रात कोविड-१९ रुग्णांच्या उपचारादरम्यान ऑक्सिजन सिलेंडरची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होत असून, त्यामुळे उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांचा मृत्यू होण्याची भीती आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. डॉक्टर सिंह म्हणतात की, ऑक्सिजन सिलेंडरच्या टंचाईमुळे जर कुठल्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याची सर्व जबाबदारी रुग्णालयातील मेडिकल सुप्रिटेंडेंट म्हणजे माझ्यावर येईल. त्यानंतर माझ्यावर कारवाई होईल. अशा परिस्थितीत तुम्ही मला या पदावरून कार्यमुक्त करावं. तसे झाल्यास मी तुमचा आयुष्यभर आभारी राहीन, असे त्यांनी आरोग्य सचिव प्रत्यय अमृत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

नालंदा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाला जेवढ्या संख्येने ऑक्सिजन सिलेंडर मिळाले पाहिजेत, तेवढ्या संख्येने ते मिळत नाही आहेत, त्याच्या जागी अन्य रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, एनएमसीएचच्या मेडिकल सुप्रिटेंडेंट यांचे हे पत्र ट्विट करत तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार सरकारवर जोरदार टीका केली आहे. हा नितीश कुमार यांचा छद्म विकास आहे. नालंदा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या अधीक्षकांनी ऑक्सिजनच्या टंचाईमुळे स्वत:ला कार्यमुक्त करण्याची विनंती केली आहे. त्यावरून तुम्ही परिस्थितीची कल्पना करा. १६ वर्षे मुख्यमंत्री असलेल्यांकडून उत्तर मागण्याच मनाई आहे. ते १६ काय १६०० वर्षे मुख्यमंत्री राहतील तेव्हाही आपली चूक कबूल करणार नाहीत, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

Leave a Comment